कलाकारांची मुलं ही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मनोरंजन क्षेत्राची वाट धरतात असे एक समीकरण तयार झालेले आहे. बॉलिवूड सृष्टीत तर अशा गोष्टी सर्रास पाहिल्या जातात. पण मराठी सृष्टीतील काही मंडळी त्याला अपवाद ठरली आहेत. कारण बऱ्याचशा कलाकारांनी त्यांच्या मुलांना आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. अलका कुबल, शरद पोंक्षे, भरत जाधव यांची मुलं पायलट तसेच डॉक्टर झाली आहेत. त्याच जोडीला अशोक आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा देखील मराठी इंडस्ट्रीपासून खूप दूर असलेला पाहायला मिळतो आहे. अनिकेत सराफ हा प्रोफेशनल शेफ आहे.

सुरुवातीच्या काळात त्याने कला क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र करिअर म्हणून त्याने परदेशात शेफ म्हणून नोकरी केली होती. पण आता अनिकेतने एका वेगळ्याच प्रवासाला सुरुवात केलेली पाहायला मिळते आहे. काही दिवसांपूर्वी अनिकेत लंडनमध्ये गेला होता. दक्षिण युक्रेनमध्ये असलेल्या ऑक्सफेर्ड इंग्लिश सेंटर येथे त्याने एक इंटवह्यू दिला. इंग्लिश या सेकंड लँग्वेजसाठी त्याची टीचर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नुकताच त्याने हा जॉब स्वीकारला असून आता अनिकेत शिक्षक म्हणून एक वेगळी ओळख बनवत आहे. अनिकेत उर्फ निक सराफ हा गेली अनेक वर्षे परदेशातच वास्तव्यास आहे. परदेशात राहून त्याने काही नाटकांचे लेखन केले होते. याशिवाय नाटकातून त्याने काही भूमिका देखील साकारल्या होत्या.

अनिकेतला कविता लिहिण्याची देखील आवड आहे. मल्टीटॅलेंटेड असलेल्या अनिकेतने आता करिअर म्हणून कला क्षेत्रात गुंतून न राहण्यापेक्षा आता वेगळ्या विषयाची वाट धरली आहे. याचा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना नक्कीच अभिमान आहे. आई वडील दोघांच्याही अतिशय जवळचा असलेल्या अनिकेत आता त्याची ही वेगळी ओळख बनवू पाहत आहे. त्याने करिअर म्हणून निवडलेल्या या क्षेत्रात तो नक्कीच यश मिळवेल असा विश्वास आहे. दरम्यान लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि उत्कृष्ट शेफ याशिवाय तो आता शिक्षक म्हणून ओळखला जातोय. ही त्याची नवीन ओळख मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच आश्चर्यकारक बाब म्हणावी लागेल. या नवीन प्रवासासाठी अनिकेत सराफ याला मनपूर्वक शुभेच्छा.