काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशोक सराफ यांचा हा बहुमान होताना पाहून निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीही त्यांचा गौरव करावा म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला होता. नुकताच हा सोहळा पार पडला. दाक्षिणात्य अभिनेते ब्रह्मानंदम आणि महेश टिळेकर यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर बॉलिवूड अभिनेते असरानी, दिलीप प्रभावळकर, वर्षा उसगावकर, सोनाली कुलकर्णी असे दिग्गज कलाकार उपस्थित होते.
खरं तर मराठी मंचावर ब्रह्मानंदम यांची येण्याची ही पहिलीच वेळ असावी. ब्रह्मानंदम यांच्या हस्ते आपला सन्मान होणार हे अगोदर अशोक सराफ यांना माहितीच नव्हते. पण जेव्हा त्यांनी ब्रह्मानंदम यांना मंचावर पाहिले तेव्हा ते खूपच खुश झाले. हे फक्त तूच करू शकतो रे अशी एक कौतुकाची थाप त्यांनी महेश टिळेकर यांना दिली होती. याबद्दल महेश टिळेकर सांगतात की, I did it. सन्मान मराठीतील महानायकाचा, माझ्या मराठी तारका निर्मिती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा गौरव करण्याचं भाग्य मला लाभलं. अशोक मामांना ज्यांच्या विनोदी भूमिका आवडतात, आणि ज्यांनी आत्तापर्यंत १३०० सिनेमांमधून विनोदी भूमिका करण्याचा विश्व विक्रम केला आहे असे माझे मित्र प्रसिद्ध तेलुगू अभिनेते ब्रम्हानंदम यांना मी या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं.
अशोक मामांना हा सुखद धक्का दिल्यामुळे “महेश हे तूच करू शकतो रे बाबा” अशी कौतुकाची थाप त्यांच्याकडून मिळाली. अशोक सराफ, ब्रम्हानंदम, बॉलीवूड मधील प्रसिद्ध विनोदी अभिनेता असरानी, मराठीतील दिलीप प्रभावळकर या दिग्गज कलाकारांच्या बरोबर मला, वर्षा उसगावकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, संस्कृती बालगुडे. आम्हाला स्टेज शेअर करायला मिळणं आणि गौरव सोहळ्याच्या सोनेरी क्षणाचे साक्षीदार होता येणं हे आमचं किती मोठं भाग्य! ब्रम्हानंदम यांनी स्वतः केलेलं साईबाबांचे एक पेंटिग अशोकमामांना भेट देऊन त्यांचा खास साऊथ स्टाईल मध्ये सन्मान केला. या सोहळ्यात सावनी रवींद्र, मंगेश बोरगावकर, प्रसेनजीत कोसंबी, राजेश्वरी पवार, वर्षा जी यांनी अशोक मामांची लोकप्रिय गाणी गाऊन प्रेक्षकांची अक्षरशः मने जिंकली.
या सर्वांचे आणि निवेदन करणारा आर जे बंड्या तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पुणेकर प्रेक्षकांनी भरभरून दिलेला प्रतिसाद, टाळ्या, शिट्ट्या याबद्दल त्यांचा मी सदैव ऋणी राहीन. सुषमा शिरोमणी यांच्या नंतर महेश टिळेकर यांनी त्यांच्या चित्रपटात हिंदी कलाकारांना नाचवलं होतं. मराठी तारका हा कार्यक्रम ते गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. याच माध्यमातून अशोक सराफ यांचाही आपण सन्मान करावा हि त्यांची ईच्छा होती.