Breaking News
Home / जरा हटके / राजा गोसावी यांचा स्मृती दिन.. ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे राजा गोसावी यांची मुलगी
raja gosavi sharmishtha deshpande
raja gosavi sharmishtha deshpande

राजा गोसावी यांचा स्मृती दिन.. ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे राजा गोसावी यांची मुलगी

आज २८ फेब्रुवारी रोजी दीवंगत अभिनेते राजा गोसावी यांचा स्मृतिदिन. मेकअप रूममध्ये चेहऱ्याला रंग लावत असताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने राजा गोसावी यांचे निधन झाले होते. चिमण्यांची शाळा, गंगेत घोडं न्हालं, येथे शहाणे राहतात, दोन घडीचा डाव, अवघाची संसार, डार्लिंग डार्लिंग, तुझे आहे तुजपाशी या आणि अशा कितीतरी कलाकृतीतून सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवला होता. विनोदाचा राजा अशी नावाप्रमाणेच त्यांनी या सृष्टीत स्वतःची ओळख बनवली होती. सुनंदा या राजा गोसावी यांच्या पत्नी, ३ मुलं आणि २ मुली अशी एकूण पाच अपत्ये त्यांना झाली. ज्येष्ठ अभिनेत्री शमा देशपांडे या राजा गोसावी यांच्या कन्या.

raja gosavi daughter shama deshpande
raja gosavi daughter shama deshpande

त्यांचे खरे नाव शर्मिष्ठा पण त्या शमा हेच नाव आत्मसात करतात. गोठ, कन्यादान, हाच सूनबाईचा भाऊ या मराठी मालिका चित्रपटासह त्यांनी हिंदी मालिका आणि चित्रपटात देखील काम केलेलं आहे. मराठीपेक्षा त्या हिंदी सृष्टीत चांगल्या रुळल्या होत्या. वडील नाटकातून काम करत तेव्हा ते शमाला सोबत घेऊन जात असत. अशातच बालपणीच शमा यांचाही अभिनय क्षेत्रातला प्रवास सुरु झाला होता. वडील राजा गोसावी यांच्यासोबत त्यांना रंगभूमीवर काम करता आलं. एखाद्या कलाकाराच्या अनुपस्थितीत ती भूमिका शमा याना करायला मिळायची. दुर्दैवाने राजा गोसावी यांच्या निधनानंतर शमा यांना अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी मिळत गेली. त्यांचं हे यश पाहायला वडील असायला हवे होते ही खंत त्यांच्या कायम मनात राहिली आहे. शमा यांनी किरण देशपांडे सोबत प्रेमविवाह केला होता.

shama deshpande
shama deshpande

दोन मुली असा त्यांचा सुखी संसार चालू होता. त्यानंतर किरण यांना ड्रिंकचं व्यसन लागलं यातच त्यांना लिव्हर सोरायसिस झाला. सात वर्षे ते या आजाराला तोंड देत राहिले. घर चालवण्यासाठी शमा देशपांडे अभिनयाकडे वळल्या. अभिनय, मुलींचे पालनपोषण, नवऱ्याचे आजारपण अशी तारेवरची त्यांना कसरत करावी लागत असे. कधी कधी शूटिंगमध्ये असतानाही अचानक काही झाले तर नवऱ्याला त्यांना दवाखान्यात घेऊन जावे लागत असे. सात आठ वर्षे आजाराशी तोंड देत असताना नवऱ्याचे निधन झाले. मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी असल्याने हॉस्टेलशिवाय पर्याय नव्हता. दरम्यान शमा यांनी अभिनय क्षेत्रात चांगला जम बसवला होता. मुली मोठ्या होत होत्या त्यांची लग्न झाली. याचदरम्यान  कुटुंब या हिंदी मालिकेत एकत्रित काम करताना अभिनेते साई बल्लाळ यांच्याशी त्यांची ओळख झाली.

एक दीड वर्ष एकत्रित काम केल्यानंतर साई बल्लाळ यांना शमा देशपांडे आवडू लागल्या. शमाच्या  पूर्वायुष्याबद्दल त्यांना कल्पना होती. शेवटी त्यांनीच पुढाकार घेऊन शमा यांना लग्नाची मागणी घातली. एक अभिनेत्री म्हणून या वयात कुठेतरी कोणाचा आधार असावा म्हणून त्यांनी साई बल्लाळ यांच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला. लग्नानंतर त्यांच्या दोन्ही मुलींनीही त्यांना वडील म्हणून स्वीकारलं होतं. मुळशी मध्ये शमा देशपांडे यांचं मोठं घर आहे. घराच्या आसपास बरीचशी आयुर्वेदिक झाडं त्यांनी लावली आहेत. घराचं इंटेरिअर स्वतः शमा यांनीच केलेलं आहे. आता आपल्याला कोणाची फी भरायची नाही, घरखर्च भागवायचा नाही यामुळे त्या आता निश्चिंत झाल्या आहेत. त्याचमुळे आता आपल्याला ज्या पटतील अशाच भूमिका त्यांनी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. अगोदर घर चालवायचं म्हणून खूप प्रोजेक्ट स्वीकारले पण आता स्वतःला वेळ द्यायचा असं त्यांनी ठरवलं आहे. आज राजा गोसावी यांचा स्मृतिदिन आहे, प्रत्येक क्षणी तुमची आठवण येते असे म्हणत वडिलांच्याप्रति आज त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.