अशी ही बनवाबनवी हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक अजरामर चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटातील केवळ पात्रच नाहीत तर त्यांचे डायलॉग देखील प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ आहेत. चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी सुधीरचे पात्र रंगवले होते. मात्र राहायला जागा मिळावी म्हणून हा सुधीर सुधाची भूमिका रंगवू लागला. सचिन पिळगावकर यांनी आपल्या सुंदर अभिनयातून साकारलेली सुधा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मराठी सृष्टीत एका अभिनेत्याने साकारलेली स्त्रीवेशातील सर्वात सुंदर नायिका म्हणून सचिन पिळगावकर यांचे नाव घेतले जाते. हीच सुधा आता स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या मंचावर अवतरलेली पाहायला मिळणार आहे. २७ मार्च हा जागतिक रंगभूमी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
याच दिवसाचे औचित्य साधून मी होणार सुपरस्टारच्या मंचावरून ९ स्पर्धक आपली कला सादर करताना दिसणार आहेत. यावेळी सिद्धांत मोदी या चिमुकल्याने केलेला गेटअप विशेष लक्ष्यवेधी ठरलेला पाहायला मिळतो. अशी ही बनवाबनवी या चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी साकारलेले सुधाचे पात्र ज्या गेटपमध्ये पहायला मिळाले होते, अगदी तसाच गेटअप सिद्धांताने केलेला आहे. त्यामुळे सिद्धांत हा बालपणीची सुधा म्हणून शोभावी अगदी तशीच वाटत आहे. गं कुणी तरी येणार येणार गं या गाण्यात सचिनजींनी सुधा बनून लाल रंगाची साडी आणि केसात गजरा माळलेला असतो, अगदी तसाच पेहराव सिद्धांतने केलेला आहे. आणि हेच गाणं तो या मंचावर सुदाररित्या गाताना दिसणार आहे. सिद्धांतला पाहून अनेकांना ही बालपणीची सुधाच वाटली आहे.
सचिन पिळगावकर यांनी सिद्धांतने गायलेल्या या गाण्याचे भरभरून कौतुक केले आहे. तर वैशाली सामंत यांनी सिद्धांतला नजर लागू नये म्हणून दृष्ट काढली तर आदर्श शिंदे यांना सिद्धांतसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. सिद्धांतने आपल्या गायकीने प्रेक्षकांची मने जिंकून घेत टॉप ९ मध्ये स्थान निश्चित केले आहे. एवढेच नाही तर या शोमुळे सिद्धांतला अमाप प्रसिद्धी देखील मिळाली आहे. सिद्धांत हा १० वर्षांचा असून, पाचवी इयत्तेत शिकत आहे. गाण्याची विशेष आवड असलेला सिद्धांत इचलकरंजी कोल्हापूर येथे कुटुंबासोबत राहतो. सुधाच्या गेटअप मधला सिद्धांत प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. त्याचा हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर झाले असतील यात शंका नाही.