झी मराठी वाहिनीवरील लोकमान्य या मालिकेने आता बऱ्याच वर्षांचा लीप घेतलेला आहे. त्यामुळे या मालिकेतून प्रमुख बालकलाकारांची एक्झिट झाली आहे. मालिकेत आता स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते यांना प्रमुख भूमिकेत पाहिले जात आहे. या दोघांची एन्ट्री कधी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. ही उत्सुकता आता शिथिल झालेली पाहायला मिळत आहे. लोकमान्य टिळकांच्या आयुष्यात आता एका महत्त्वाच्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. गोपाळ गणेश आगरकर हे पत्रकार, शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जात होते.
आपले मॅट्रिकचे शिक्षण झाल्यानंतर आगरकर पुण्यात आले. यादरम्यान त्यांनी वृत्तपत्रातून लेख लिहिण्यास सुरुवात केली होती. एमए चे शिक्षण घेत असतानाच त्यांची लोकमान्य टिळकांशी ओळख झाली. इथूनच केसरी या वृत्तपत्राची सुरुवात झाली. केसरी वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या याच प्रवासाचा आढावा आता लोकमान्य मालिकेतून दाखवला जात आहे. त्यामुळे मालिकेत आगरकरांची एन्ट्री झालेली आहे. अभिनेता अंबर गणपुळे ही भूमिका साकारताना दिसणार आहे. आगरकरांच्या गेटअपमध्ये त्याला बऱ्याच प्रेक्षकांनी ओळखले असेलच. अंबरने स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा यात महत्वाची भूमिका साकारली आहे. कार्तिकचा भाऊ आदित्य ही भूमिका त्याने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वठवली आहे.
मालिकेत काम करत असतानाच अंबरला आता झी मराठी वाहिनीच्या मालिकेने आमंत्रण दिले आहे. प्रथमच तो ऐतिहासिक पात्र साकारत असल्याने या भूमिकेसाठी तो खूपच उत्सुक आहे. अंबर पुण्यातच वास्तव्यास असून सिम्बॉईसीस कॉलेजमधून त्याने शिक्षण घेतले आहे. यासोबतच हॉटेल मॅनेजमेंटचे देखील त्याने प्रशिक्षण घेतले होते. मात्र अभिनयाची ओढ त्याला मालिका सृष्टीत घेऊन आली. ती फुलराणी या मालिकेत अंबर महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर लहान मोठ्या ऍडफिल्मसाठी त्याने काम करण्यास सुरुवात केली. रंग माझा वेगळा या मालिकेमुळे अंबर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्याने साकारलेली आदित्यची भूमिका खूपच लोकप्रिय झाली. मात्र आता या मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेऊन तो लोकमान्य मालिकेत आगरकरांच्या भूमिकेत झळकणार आहे.
रंग माझा वेगळा या मालिकेने अंबरला फेम दिलं मात्र आता या नवीन भूमिकेने त्याला ऐतिहासिक पात्र साकारण्याची संधी मिळाली आहे. या भूमिकेसाठी अंबरने संपूर्ण लूक सुद्धा बदललेला आहे. त्यामुळे त्याची ही भूमिका अधिकच उठावदार झाली आहे. उत्तम संवाद फेक आणि आवाजातील करारेपणा पाहून प्रेक्षकांनी अंबरचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. गोपाळ गणेश आगरकर यांच्या भूमिकेसाठी अंबर गणपुळे याचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा.