मराठी मालिका अभिनेत्री सुरभी भावे दामले हिने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या लेकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरभिला कन्यारत्न प्राप्ती झाली. ‘सानवी’ हे तिच्या मुलीचं नाव आहे या नावाचा अर्थ आहे लक्ष्मी. सानवीच्या जन्मानंतर आता काही दिवसातच सुरभी भावे तीतक्याच जोमाने पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय होत आहेत. सुरभी भावे या राणीलक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत काही वर्षे शिक्षण घेत होत्या. त्यामुळे सुरुवातीपासूनच शिस्त त्यांच्या अंगवळणी पडली होती. घोडेस्वारी, कराटे याचेही प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. आजोबा भूमिगत चळवळीत पत्रकार होते, त्यामुळे मिडिया क्षेत्रात काहीतरी करण्याच्या हेतूने मास मीडियाचे धडे गिरवले.
मास मीडियाचे शिक्षण घेतल्यानंतर मीडिया माध्यमात त्यांनी काही काळ नोकरी केली होती. यात प्रामुख्याने स्मिता तळवळकर यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन देखील घेतले. परंतु अभिनयाची आवड असल्याने ओघानेच त्यांची पावले या क्षेत्राकडे वळली. वेगवेगळ्या नाटकांसाठी ऑडिशन देणे चालू होते, त्यात अनेक व्यावसायिक नाटकातून काम करण्याची संधी मिळाली. गेल्या ९ ते १० वर्षांपासून त्या मालिका आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. यात महत्वाचे म्हणजे असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, तुला पाहते रे, सख्या रे, गोठ, स्वामिनी, ग सहा जणी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अस्मिता, माझे पती सौभाग्यवती, चित्रगथी, क्राईम डायरी, चंद्र आहे साक्षीला. या गाजलेल्या मालिकेतून त्यांना महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. बहुतेक मालिकेतून त्यांच्या वाट्याला विरोधी भूमिका आलेल्या पाहायला मिळाल्या. त्यातूनच स्वामिनी मालिकेतील भामिनीची भूमिका त्यांनी आपल्या अभिनयाने चांगलीच वठवली होती.
त्यांनी निभावलेल्या या विरोधी भूमिकेचा प्रेक्षकांना रागही यायचा. कित्येकदा महिला त्या जिथे दिसतील तिथे जाऊन किती वाईट वागतेस असे बोलायच्या, हीच त्यांच्या अभिनयाची खरी पावती ठरली होती. सुरभी भावे यांचा स्वतःचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय देखील आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी साड्या विक्रीचा व्यवसाय देखील सुरू केला होता. एकीकडे अभिनय आणि व्यावसायिका या भूमिका निभावत असताना त्यांच्या या व्यवसायाला लोकांकडून खूप चांगली मागणी मिळत आहे. २१ जानेवारी २०२२ रोजी बहुप्रतिक्षित पावनखिंड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुरभी भावेच्या वाट्याला देखील महत्वाची भूमिका आली आहे. मातोश्री सोनाई देशपांडे ही व्यक्तिरेखा त्या या चित्रपटातुन साकारत आहेत. त्यामुळे ह्या चित्रपटाची आतुरता सुरभीला देखील लागून राहिली आहे. कन्यारत्न प्राप्तीबद्दल अभिनेत्री सुरभी भावे दामले यांचे अभिनंदन!