ह्या वर्षी अनेक मराठी सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकल्या आहेत. लवकरच अभिनेत्री रसिका सुनील ही देखील लग्न करणार असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या लग्नाची खरेदी केलेली पाहायला मिळाली होती. काल शुक्रवारी २७ ऑगस्ट रोजी मराठी मालिका अभिनेत्री “प्रेरणा निगडीकर” आणि मालिका दिग्दर्शक “स्वप्नील मुरकर” या दोघांचा मोठ्या थाटात विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला काही मोजक्या कलाकार मंडळींना त्यांनी आमंत्रित केले होते. प्रेरणा आणि स्वप्नील या नवदाम्पत्यास मराठी सृष्टीतून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
![prerana nigdikar weds swapnil murkar](https://kalakar.info/wp-content/uploads/2021/08/prerana-nigdikar-weds-swapnil-murkar.jpg)
प्रेरणा निगडीकर ही मूळची साताऱ्याची. महाविद्यालयिन शिक्षण घेतल्यानंतर अभिनयाची आवड असल्याने प्रेरणाने पुण्यातील ललित कला केंद्र मध्ये प्रवेश घेतला. इथूनच तिची रंगभूमीशी नाळ जोडली गेली. स्वातंत्र्याच्या काठवरती, शांतता कोर्ट चालू आहे अशी अनेक नाटकं तिने अभिनित केली आहेत. या नाटकातून काम करत असताना तिच्या अभिनयाला उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिक मिळाली आहेत. प्रेरणा निगडीकर ही फ्री लान्सर मॉडेल म्हणूनही ओळखली जाते. राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका असा तिचा प्रवास सुरु असताना मालिकेतून तिला काम करण्याची संधी मिळाली. स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून प्रेरणाने मामीची भूमिका साकारली होती. याशिवाय दूरदर्शनवरील ‘भक्तीरंग’ या मालिकेचे सूत्रसंचालन देखील तिनं केलं आहे.
![director swapnil murkar](https://kalakar.info/wp-content/uploads/2021/08/director-swapnil-murkar.jpg)
प्रेरणा आणि स्वप्नील एकमेकांना खूप आधीपासूनच ओळखतात. स्वप्नील मुरकर ह्याने बालमोहन विद्यामंदिर येथून शालेय शिक्षण आणि डी जी रुपारेल इथून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका, नाट्य स्पर्धेतून त्याने सहभाग दर्शवला होता. सोनी मराठी वाहिनीवर आठशे खिडक्या नऊशे दारं ही मालिका प्रसारित झाली होती. या मालिकेचे दिग्दर्शन स्वतः स्वप्नीलने केले होते. प्रत्येक कलाकार आपआपल्या मोबाईलवरून चित्रीकरण करून ते स्वप्नीलकडे पाठवत होते ह्या सर्व चित्रीकरणाची एकत्रित जडणघडण करताना सुरुवातीला खूप त्रास झाला मात्र हा एक वेगळा अनुभव स्वीकारण्याचे धाडस त्याने दाखवले. या मालिकेला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला होता. रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेशी तो निगडित आहे. ‘लाडाची मी लेक गं’ या झी मराठीवरील मालिकेचेही दिग्दर्शन त्याने केले आहे. दुर्दैवाने या मालिकेला प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने ही मालिका आटोपती घेण्यात आली होती. प्रेरणा निगडीकर आणि स्वप्नील मुरकर या नवदाम्पत्याना आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!
![actress prerana nigadikar](https://kalakar.info/wp-content/uploads/2021/08/actress-prerana-nigadikar.jpg)