हिंदी बिग बॉस प्रमाणे मराठी बिग बॉस हा रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठी बिग बॉसचा शो लवकरच प्रसारित होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे हा शो कधी सुरू होणार याचीच प्रेक्षक वाट पाहत होते. मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच समोर आला असून १९ सप्टेंबरपासून हा शो संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर टेलिकास्ट केला जाणार आहे. या शोचे सूत्रसंचालन अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहेत.
मराठी बिग बॉसच्या घराचे काम जून महिन्यातच सुरू करण्यात आले होते त्याचा नवा लूक कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. या घराचे बाहेरील आणि आतील बाजूचे काही फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनसाठी वाड्याची थीम देण्यात आली आहे. भव्य वाड्याप्रमाणे सजवलेले बिग बॉसचे हे घर दिमाखात उठून दिसत आहे. घराच्या आतील बाजूसही अशीच वाड्याप्रमाणे रचना केली असून भिंतींवर चित्र रेखाटलेली पाहायला मिळत आहेत.
बिग बॉस शोच्या आयोजकांनी अभिनेत्री केतकी चितळेला सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते मात्र तिने या घरात येण्यास नकार दिला आहे. कलर्स वाहिनीने काही कलाकारांवर शिक्कामोर्तब केला आहे ते कलाकार कोण आहेत ते पाहुयात.. “नकुल घाणेकर” हा अभिनेता बिग बॉसच्या घरात स्पर्धक बनून येणार असल्याचे खात्रीशीर सांगितले जात आहे. नकुल डान्सर, कोरिओग्राफर आणि अभिनेता म्हणून ओळखला जातो. संघर्ष, अजूनही चांद रात आहे, जय मल्हार यासारख्या मालिका चित्रपटातून तो झळकला आहे. यासोबतच अभिनेत्री दीप्ती देवी ही देखील मराठी बिग बॉसच्या घरात हजेरी लावणार असल्याचे सांगितले जाते. नाळ चित्रपटातून दीप्ती देवीला अभिनयाची संधी मिळाली होती मात्र या चित्रपटात तिला कुठलाच डायलॉग देण्यात आला नव्हता. या शोमध्ये सूर्यकांत वाघमारे हे नाव देखील शिक्कामोर्तब केले आहे मात्र ही व्यक्ती नेमकी कोण हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.
या कलाकारांसोबत संकर्षण कऱ्हाडे, किशोरी अंबिये, ऋषी सक्सेना, पल्लवी सुभाष, रुपल नंद, समीर चौगुले, अंशुमन विचारे या नावांची देखील चर्चा आहे. हे कलाकार बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये झळकणार असल्याचे अनेक माध्यमातून सांगण्यात आले आहे. मात्र यातील बहुतेक कलाकार हे सध्याच्या घडीला मालिकांमधून काम करताना दिसत आहेत. त्यामुळे या बातमीत किती तथ्य आहे हे लवकरच प्रेक्षकांसमोर येईल. परंतु नकुल घाणेकर , दीप्ती देवी, सूर्यकांत वाघमारे ही नावे खात्रीशीर पणे बिग बॉसच्या घरात येणार असल्याचे स्वतः कलर्स वाहिनीने प्रेक्षकांना घातलेल्या कोड्यातून स्पष्ट होत आहे. येत्या १९ सप्टेंबर पासून मराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याची उत्सुकता तमाम प्रेक्षकांना आहेच शिवाय या घरात घडणाऱ्या गमतीजमती पाहण्यासाठी ते आतुर झाले आहेत हे वेगळे सांगायला नको.