हिंदी चित्रपट सृष्टीत आजवर अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. या यादीत स्मिता पाटील, माधुरी दीक्षित, पल्लवी जोशी, रिमा लागू, ललिता पवार, सुलोचना लाटकर अशा अनेक दिग्गज मराठमोळ्या कलाकारांची नावे घेता येतील. याच यादीतील आणखी एक नाव म्हणजे अभिनेत्री “नंदा कर्नाटकी”. ‘ये समा समा है ये…’, ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना…’, ‘परदेसीयो से ना अखियाँ मीलाना… ‘ अशी अनेक बॉलिवूडची हिट गाणी नंदावर चित्रित झाली आहेत. नंदा कर्नाटकी ही दिग्दर्शक मास्टर विनायक कर्नाटकी यांची मुलगी . वयाच्या ७ व्या वर्षीच ‘मंदिर’ या चित्रपटात त्यांनी नंदाला बालकलाकाराचे काम दिले होते. सुरुवातीला बहुतेक चित्रपटातून ती नायकाच्या बहिणीच्या भूमिकेतच जास्त पाहायला मिळाली.
नंदाचे वडील विनायक कर्नाटकी हे मूळचे कोल्हापूरचे. व्ही शांताराम यांच्याशी त्यांचे कौटुंबिक नाते होते. ४० च्या दशकात त्यांनी लपंडाव, छाया, संगम, अर्धांगी अशा हिंदी मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. आपल्या मुलीला देखील त्यांनीच अभिनयाची संधी उपलब्ध करून दिली होती. वडिलांच्या निधनानंतर आर्थिक जबाबदारीमुळे नंदाने चित्रपटातच काम करायचे ठरवले. पण बहुतेकदा ती बहिनीच्याच भूमिकेत दिसली होती प्रमुख नायिका बनण्याची संधी तिला मराठी चित्रपटातूनच मिळाली होती. १९५५ सालच्या “कुलदैवत” या मराठी चित्रपटात नंदाने (तुळसाची भूमिका) प्रथमच मुख्य नायिकेची भूमिका साकारली. त्यानंतर व्ही शांताराम यांनी तिला हिंदी चित्रपटातून नायिकेची भूमिका दिली. जब जब फुल खिले, जोरु का गुलाम, गुमनाम, राजा साब, इत्तेफाक अशा अनेक चित्रपटात नंदाने महत्वाच्या भूमिका बजावल्या. आपला काळ संपला असल्याचे लक्षात येताच नंदाने अभिनयातून निवृत्ती स्वीकारली. ‘प्रेम रोग’ या चित्रपटात नंदाने पद्मिनी कोल्हापूरे हिच्या आईची भूमिका साकारली होती हा त्यांनी अभिनित केलेला शेवटचा चित्रपट ठरला होता.
आयुष्याला अनेक कलाटणी मिळालेली नंदा चित्रपट निर्माते मनमोहन देसाई यांच्या प्रेमात पडल्या मात्र हे प्रेम त्यांच्याकडे व्यक्त होण्या अगोदरच मनमोहन देसाई यांनी लग्न केले होते. लग्नानंतर काही वर्षातच मनमोहन देसाई यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर १९९२ साली नंदाने आपल्या वयाच्या ५३ व्या वर्षी मनमोहन देसाई यांच्यासोबत साखरपुडा केला. परंतु नंदाच्या नशिबात हे सुख फार काळ टिकले नाही साखरपुड्या नंतर दोन वर्षातच मनमोहन देसाई यांचे निधन झाले. मनमोहन देसाई हेच आपले पती असे समजून लग्न न करताच ती त्यांची विधवा बनून वावरू लागली होती. जेव्हा कधी नंदा मिडियासमोर यायची तेव्हा देखील ती पांढऱ्या कापड्यांमध्येच दिसायची. मीडिया आणि ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहून ती आपले जीवन एकाकीपणे व्यतीत करू लागली. अखेर २५ मार्च २०१४ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी नंदा कर्नाटकी यांनी या जगाचा निरोप घेतला.