तुझ्यात जीव रंगला मालिकेतील नंदिता वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर लवकरच झी मराठी वरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धनश्री काडगावकर हिने वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात मुलगा झाल्याची गोड बातमी दिली होती. धनश्रीचा मुलगा कबीर आता ८ महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ती अभिनय क्षेत्राकडे वळलेली पाहायला मिळत आहे. मधल्या काळात धनश्रीने आपल्या बाळंतपणानंतर फिटनेसकडेही लक्ष्य केंद्रीत केले होते.
झी मराठी वाहिनीवरील “घेतला वसा टाकू नको” या मालिकेतून धनश्री दुर्गा मातेची भूमिका साकारत आहे. लवकरच या मालिकेत नवरात्री विशेष भाग पाहायला मिळणार आहे त्यात ती महत्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे. घेतला वसा टाकू नको या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपले संस्कृती, सण यांची सांगड नेमकी कुठून घडत गेली याचा उलगडा या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अगदी पितृ पक्षात देखील पीत्रांचे महत्व का आहे हे कथेतून दाखवण्यात आले होते. आता लवकरच नवरात्रीस सुरुवात होत आहे आणि त्याचेही महत्व या मालिकेतून दाखवले जाणार आहे. घेतला वसा टाकू नको या मालिकेच्या माध्यमातून अनेक नव्या जुन्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळत गेली आहे.
त्यात आता धनश्री देखील आपल्या कबीरच्या जन्मानंतर प्रथमच मालिकेतून दिसणार आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेअगोदर गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेतून आणि चिठ्ठी या चित्रपटातून झळकली होती. तुझ्यात जीव रंगला मालिकेतून ती विरोधी भूमिकेत पाहायला मिळाली होती. घेतला वसा टाकू नको या मालिकेत तिला महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे अर्थात ही भूमिका काही दिवसांचीच असली तरी तिच्या पुनरागमनाचे स्वागत तिच्या चाहत्यांनी केले आहे. या मालिकेसाठी धनश्री काडगावकर हिचे खूप खूप अभिनंदन…