शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला जवान हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. नयनतारा, विजय सेथुपती, प्रियमनी, योगी बाबू अशा दाक्षिणात्य कलाकारांसह अभिनेत्री गिरीजा ओक देखील या चित्रपटात महत्वाचा भाग बनले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थीएटर बाहेर गर्दी करत आहेत. नुकताच हा चित्रपट पाहण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याने हजेरी लावली होती. जवान पाहिलाच पण तो ही चक्क पायरीवर बसूनच. जिथे हाऊसफुल्लची गर्दी असल्याने अभिनेत्याने पायरीवर का होईना पण हा चित्रपट पाहिल्याचे समाधान व्यक्त केले आहे.
पण यामुळे हा अभिनेता आता ट्रोलिंगच्या निशाण्यावर आला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून शरद केळकर आहे. शरद केळकरने शाहरुख वरील प्रेमाखातर आज चक्क पायऱ्यांवर बसून त्याचा चित्रपट पाहिला आहे. थिएटरमधला एक खास फोटो शरदने त्याच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. मात्र या त्याच्या कॅप्शनवर ट्रोलर्सने त्याला धारेवर धरले आहे. अर्थात मराठी चित्रपटांवर एवढे प्रेम दाखवले असते तर मराठी चित्रपटही पुढे गेले असते असे या चाहत्यांनी म्हटले आहे. शरद केळकर याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात हिंदी मालिकेपासून केली होती. बाहुबली चित्रपटासाठी डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर शरद केळकरवर कौतुकाचा वर्षाव झाला. लई भारी या चित्रपटातून तो मराठी सृष्टीत झळकला.
त्यानंतर बऱ्याच भूमिका त्याने मराठी सृष्टीत रंगवल्या. हर हर महादेव आणि तानाजी या चित्रपटाने त्याला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. एकीकडे हिंदी चित्रपटांना बॉयकॉट केले जाते त्याच बाजूला आपलेच मराठी कलाकार हिंदी कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचतात. त्यांच्या कामाचे कौतुक करतात एवढेच नाही तर हिंदी चित्रपट पहायलाही जातात. पण मराठी कलाकारच मराठी चित्रपटांना म्हणावा तेवढा प्रतिसाद देत नाहीत अशी शोकांतिका व्यक्त करण्यात येते. शरद केळकरच्या बाबतीतही आज असेच झाले असे म्हणायला हरकत नाही. जिथे सुभेदार सारखा दर्जेदार चित्रपट पाहायला आपला इतिहास जाणून घ्यायला हे कलाकार मागेपुढे पाहतात. तिथेच शाहरुख सारख्या कलाकाराला डोक्यावर घेतले जाते. म्हणूनच शरद केळकर टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे.