सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिटनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणणार असल्याचे जाहीर केले आहे. ब्रिटनने महाराजांची वाघनखं परत देणार असल्याचे पत्राद्वारे कळवले आहे. सामंजस्य करार करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार १ ऑक्टोबर रोजी लंडनला जाणार आहेत. मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, आम्हाला ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पत्र मिळाले. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं परत करण्यास ते तयार आहेत असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही १ ऑक्टोबरला लंडनला जाणार आहोत. ब्रिटनमध्ये असलेल्या प्रदर्शनात जगदंब तलवारीसह इतर काही गोष्टीही आम्ही पाहणार आहोत. शिवकालीन अनमोल ठेवा भारतात आणल्यानंतर ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येईल. जेणेकरून शिवप्रेमींना ते पाहता येतील. असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. दरम्यान ही बातमी कालपासूनच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावर आता नाना पाटेकर यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे. मुनगंटीवार महाराजांची वाघनख आणताय त्या बद्दल अभिनंदन.
जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा. नाना पाटेकर यांच्या या परखड प्रतिक्रियेवर आता संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या प्रतिक्रियेनंतर त्यांच्यावर टीकाही होत आहे तर काहींनी त्यांच्या मताचे स्वागत केले आहे. नाना पाटेकर हे बऱ्याचदा राजकीय वर्तुळात देखील आपले मत परखडपणे मांडत असतात. आताचे सरकार आहे त्याच्या बाजूने नाना पाटेकर नेहमी भरभरून बोलत आले आहेत मात्र त्यांची आताची ही प्रतिक्रिया पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे.