माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील समीर म्हणजेच संकर्षण कऱ्हाडे हा एक उत्तम कवी आहे. त्याची कविता कधी ऐकायला मिळते याकडे चाहते लक्ष ठेवून असतात. नुकताच त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मोठं नका होऊ, इतकी घाई काय असं म्हणत त्याने जगातील प्रत्येक वडिलांच्या मनातील भावना मांडल्या आहेत. संकर्षणला मूळ रूपात बघून चाहत्यांना आनंद झाला नसता तरच नवल.
अभिनय क्षेत्रात असे काही कलाकार आहे की ते फक्त अभिनेते म्हणून नव्हे तर बऱ्याच कलागुणांनी ओळखले जातात. सध्याच्या पिढीतल्या संकर्षण कऱ्हाडे याचंही नाव या पंक्तीत घेता येईल.
संकर्षण उत्तम अभिनेता तर आहेच, पण एक संवेदनशील कवी, निवेदक, लेखक, दिग्श्दर्शकही आहे. संकर्षणच्या कविता ऐकणं ही तर रसिकांसाठी पर्वणीच असते. तो जिथे जिथे कार्यक्रमांसाठी पाहुणा म्ह्णून जातो तेव्हा त्याला कविता म्हणण्याची फर्माइश केली जाते. पण गेल्या वर्षभरात संकर्षणने नवी कविताच केली नव्हती. आता मात्र त्याने ही उणीव भरून काढत एक कविता चाहत्यांना ऐकवली आहे.
गेल्या वर्षभरापासून संकर्षण मालिका आणि नाटक यामध्ये खूपच बिझी होता. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील त्याची समीर ही भूमिका खूपच गाजली. या मालिकेतून संकर्षणने पाच वर्षांनी मालिकेकडे मोर्चा वळवला. त्यापूर्वी देवा शपथ या मालिकेत मुख्य भूमिकेत संकर्षण दिसला होता.
यंदा मालिकेसोबतच तू म्हणशील तसं हे त्याचं नाटकही पुन्हा रंगमंचावर आलं. प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर यांच्या सारखं काहीतरी होतय या नाटकाचं दिग्दर्शनही संकर्षण करत आहे. मालिकेचं शूटिंग, नाटकाचे प्रयोग, परदेशातील नाटकाचे दौरे यामुळे कविता करायला वेळ मिळत नसल्याची प्रांजळ कबुलीही संकर्षणने दिली. सध्या संकर्षणच्या कवितेचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. खूप दिवसांनी कविता करतोय असं म्हणतच त्याने संवाद साधला आहे. कधी कधी सुचत नाही, कधी वेळ मिळत नाही तर कधी लिहावं असं वाटत नाही असंही त्यानं सांगितलं. मला जुळी मुलं आहेत आणि त्यांना मोठं होताना बाबा म्हणून मला काय वाटतं ही त्याची कविता जगातील प्रत्येक बाबाच्या मनातील भावना आहेत असंही तो सांगतो.
मोठं व्हायचं तर व्हा ना, इतकी घाई काय ही संकर्षणची कविता खूपच बोलकी आहे. या कवितेतून तो असं म्हणतोय, सध्याची मुलं इतकी लवकर मोठी आहेत. इतकी की तो प्रवास पाहणं पालकांच्या हातातून निसटून जात आहे. दात येणं, पहिलं पाऊल टाकणं,बोबडं बोलणं हे टप्पे पार करण्याचा मुलांचा वेग पाहून पालकांना असं वाटतं की मोठं व्हायची इतकी घाई काय आहे. संकर्षणच्या या कवितेला नेटकऱ्यांनी खूप साऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या काही वर्ष वारी बंद होती, तेव्हा पंढरीच्या विठुराया ही त्याने केलेली कविताही खूप गाजली होती. आता त्याच्या नवीन कवितेने अनेक पालकांच्या मनातील भाव शब्दबध्द केले आहेत.