गेल्या काही दिवसांपासून मुलगी झाली हो या मालिकेतील विलास पाटीलची भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत येत आहेत. एक राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांच्या विरोधात अनेकांनी उलट सुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. प्रेक्षकांच्या ट्रोलिंगला आणि धमक्यांना मी घाबरत नाही, अशीही भूमिका त्यांनी याबाबत घेतली होती. मात्र या कारणास्तव मुलगी झाली हो या मालिकेच्या निर्मात्याने त्यांना मालिकेतून बाहेर काढले होते. राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात आले. अशी चर्चा जोर धरत असतानाच मालिकेच्या निर्मात्यांनी व्यावसायिक कारण पुढे देऊन त्यांना मालिकेतून बाहेर काढले असल्याचे सांगितले आहे.
मात्र हे कारण योग्य नसल्याचे किरण माने यांचे म्हणणे आहे. नुकतीच निर्मात्यांच्या भूमिकेवर किरण माने यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे. यात ते म्हणतात की, मी शूटिंगला अगदी वेळेवर जात होतो. मी सेटवर कोठलीही तक्रार करत नव्हतो, मालिकेत मी माझी भूमिका अगदी चोख बजावत होतो. अगदी मानधन वाढवून द्या म्हणूनही मी कधीच त्यांच्याकडे तक्रार केली नव्हती. तुम्ही तुमच्या कामाशी जर प्रामाणिक असाल तर त्यांनी घेतलेली भूमिका कुठेतरी खटकते. मालिकेतला मी पूर्णपणे वेगळा आहे आणि खऱ्या आयुष्यातला किरण माने खूप वेगळा आहे. मला माझे विचार मांडण्याचा हक्क नाही का? मी घरात काय खातो, मी बाहेर काय बोलतो? मी कपडे कुठले घालतो याच्यावर कुणी बंधनं ठेवू नये.
ही लोकशाही आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेलं आहे. त्या भारतात मी राहतो, त्यामुळे मी माझं मत मांडू शकतो. ही कुठली झुंडशाही आहे की तुम्ही राजकिय मतं मांडता म्हणून तुम्हाला मालिकेतून काढून टाकण्यात येतं. मी राजकीय मतं मांडत असताना कुठल्याही राजकीय नेत्याचं नाव घेत नाही की त्यांच्यावर अश्लील टीका करत नाही. मी पुरोगामी विचारधारा मानणारा आहे छत्रपती शिवरायांचे विचार मानणारा आहे. शाहू फुले आंबेडकरांचे विचार मानणारा आहे, राजकारण हे तुमच्या रोजच्या जगण्याचं भाव ठरवतं. तुम्ही पेट्रोल डिझेल किती रुपयाचं भरता, घरात गॅस किती रुपयांचा आणता हे सर्व ठरवण्याचा अधिकार राजकारणात असतो.
म्हणून तुमची राजकारणावर नजर असली पाहिजे. मी लढा देणार, न्याय मागणार मला माझी बाजू न मांडता हा निर्णय का घेतला? याचा जाब विचारल्याशिवाय मी सोडणार नाही. माझ्या पाठीशी अनेक लोकं उभी राहिली. समजा पुढे जाऊन माझ्या बाजूने कुणी नाही आलं तरी मी एकटा लढणार. स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. माझं काम तुम्ही काढून घेतलं पण माझे विचार मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रखरपणे तुमच्यासमोर मांडत राहीन आणि पोहोचवत राहीन.