मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता विशाल निकम लवकरच मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई मायेचं कवच या कलर्स मराठीवरील मालिकेत तो मानसिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशाल निकम पाठोपाठ बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा आणखी एक सदस्य मालिकेतून एका दमदार भूमिकेत झळकताना दिसणार आहे. या अभिनेत्याने नुकतीच एक हिंट देत मालिकेतील गेटअप मधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशाल निकम पाठोपाठ आता अभिनेता अक्षय वाघमारेची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये अक्षय वाघमारे याने सहभाग दर्शवला होता. मात्र पहिल्याच एलिमिनेश राउंडमध्ये कमी मतं मिळाल्याने त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले होते.

अक्षयला बिग बॉसच्या घरात काहीच दिवसांचा कालावधी मिळाला होता त्यातही तो चर्चेत न राहिल्यामुळे प्रेक्षकांनी त्याच्या एक्झिटवर नाराजी दर्शवली होती. अक्षयला आणखी संधी मिळायला हवी होती, बाहेरील सदस्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री करण्यापेक्षा अक्षयला पुन्हा एकदा संधी मिळावी अशी त्याच्या चाहत्यांनी मागणी केली होती. अर्थात अक्षयला पुन्हा संधी मिळाली नसली तरी त्याने त्या घरातील सदस्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. आणि म्हणूनच गायत्री दातार जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली त्यावेळी तिने अक्षयची भेट घेतली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पावनखिंड या चित्रपटात अक्षयने कोयाजी बांदल ही व्यक्तिरेखा साकारली आहे. अतुलनीय पराक्रम गाजवत शिवरायांना अनोख्या चक्रव्यूव्ह रचनेतून सुखरूप विशाळगडावर पोहचविण्याची जबाबदारी कोयाजींवर होती.

बांदल सेनेचे नेतृत करीत, चित्रपटातील शेवटच्या निर्णायक लढतीत अक्षयने अप्रतिम भूमिका निभावली. बिग बॉसच्या शोनंतर आता अक्षय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी तो श्रीकृष्णाची भूमिका साकारताना दिसणार आहे. कृष्णाच्या गेटअपमधले काही फोटो अक्षयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु हा आगामी प्रोजेक्ट म्हणजे चित्रपट आहे की मालिका हे अजून त्याने उघड केलेले नाही. या नव्या प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात झाली असून सेटवरचा फोटो अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अक्षय वाघमारे सोबत आणखी कोणकोणते कलाकार या प्रोजेक्ट मधून झळकणार आहेत याबाबत काही दिवसातच उलगडा होईल. तूर्तास अक्षय वाघमारेला या नव्या प्रोजेक्टनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.