प्रत्येक मालिकेतील कथेतची नायिका किंवा नायक यांच्यासमोर त्यांच्या प्रेमाची परीक्षा घेणारा एकतरी क्षण येतोच. असा सीन मालिकेत आला की प्रेक्षकांच्या नजरा खिळून राहतात. इकडे आड तिकडे विहीर या म्हणीप्रमाणे जेव्हा मालिकेत ट्विस्ट येतो तेव्हा प्रेक्षकांनाही हुरहूर लागते. आणि कथेतील पात्रे निभावताना कलाकारांचाही कमालीचा कस लागतो. स्टार प्रवाह या वाहिनीवरील अबोली या मालिकेत सध्या हा टर्न आला असून या परिस्थितीत अबोली हिच्यासमोर एक वेगळाच पेच निर्माण झाला आहे. आता अबोली कशाची निवड करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. पोलिस इन्स्पेक्टर अंकुश शिंदे आणि अबोली यांच्या नात्याची ही गोष्ट आहे. अबोली अंकुशच्या आयुष्यात आल्यामुळे त्याचं आयुष्य कसं बदलून जातं.
अबोलीच्या आयुष्यात अंकुशच्या येण्याने तिच्या आयुष्याला काय कलाटणी मिळते याची कथा अबोली या मालिकेत गुंफण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात या मालिकेने शंभर एपिसोड पूर्ण केल्याचे सेलिब्रेशन केल्यानंतर आता मालिका रंगतदार वळणावर आली आहे. अंकुशचा काटा काढण्यासाठी त्याचे शत्रू अबोलीचाच वापर करत असल्याचे या दिसत आहे. अंकुशकडे सर्व पुरावे असलेला पेन ड्राइव्ह मिळवण्यासाठी शत्रूंनी अबोलीला जाळ्यात ओढले आहे. अबोलीने तो पेनड्राइव्ह अंकुशकडून मिळवून दिला नाही तर अंकुशला जीवे मारण्याची धमकी अबोलीला दिली जाते. जेव्हा अबोली ही गोष्ट अंकुशला सांगते, तेव्हा अंकुश पेन ड्राइव्ह तर अबोलीला देतोच. पण तिचा असंही सांगतो की, हा निर्णय तो अबोलीवर सोपवतोय.
माझी खाकी वर्दी आणि तुझी नाती पणाला लागलेली आहेत, आता तूच ठरव की काय जपायचे. माझी खाकी की तुझी नाती. हे बोल अबोलीच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न निर्माण करतात. एका पोलिस इन्स्पेक्टरची बायको म्हणून अबोलीला कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो. आणि तिच्यावरच जेव्हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अंकुश सोपवतो. तेव्हा ती त्यातून कसा मार्ग काढते ते पुढील भागात दिसेल. अभिनेता सचित पाटील हा इन्स्पेक्टर अंकुशच्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. तर एक सोज्वळ, नात्यांना जपणारी, भावनिक विचार करणारी अबोली ही भूमिका गौरी कुलकर्णी साकारत आहे. सचित आणि गौरी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असल्याने या मालिकेचा प्रेक्षकवर्ग वाढत आहे.