स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या छत्रपती ताराराणी यांचा इतिहास आजपासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७.३० वाजता ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत महाराणी ताराराणींची भूमिका अभिनेत्री स्वरदा ठिगळे साकारणार आहे तर स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची भूमिका अभिनेता संग्राम समेळ निभावणार आहेत. मात्र मालिकेच्या सुरुवातीला ताराराणींचे बालपण कसे गेले हे पाहायला मिळणार आहे त्यामुळे ताराराणींच्या बालभूमिकेत “आद्या कोल्हे” झळकणार आहे. आद्या कोल्हे या बालकलाकाराला अनेकांनी ओळखले असेलच. तिच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात…
आद्या कोल्हे ही अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची कन्या आहे. आद्याने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या मालिकेत आद्या छोट्या ताराराणीच्या भूमिकेत झळकली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले होते. बहलोलखानाशी लढताना सरसेनापती प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली. मालिकेतून हंबीरराव मोहिते यांची भूमिका अभिनेते “आनंद काळे” साकारणार आहेत, जे सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशच्या काकांची भूमिका साकारत आहेत. हंबीरराव मोहिते यांची लेक ताराराणी या छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी बनल्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीहून स्वराज्याचा कारभार पाहिला. सुमारे ७ वर्षांच्या धामधुमीनंतर ३ मार्च १७०० रोजी सिंहगड येथे त्यांना देवाज्ञा झाली. छत्रपती संभाजी राजांचे पुत्र शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे राज्यकारभाराची सर्व सूत्रे ताराराणींनी हाती घेऊन समोर उभ्या ठाकलेल्या युद्धाच्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.
मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून ताराराणींनी शत्रू थोपवून धरला, लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे संताजी धनाजी सारखे कर्तृत्ववान सरदार त्यांच्यासमोर उभे केले, दिल्लीच्या बलाढ्य राजसत्तेवर स्वतःचा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले. औरंगजेबाला जेरीस आणणाऱ्या ताराराणींचा इतिहास स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तमाम प्रेक्षकांना तसेच इतिहास प्रेमींना या मालिकेची उत्कंठा वाढवणारी ठरणार आहे. मालिकेतून आद्या कोल्हे ताराराणींची भूमिका निभावत आहे या भूमिकेसाठी आद्याचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!