आज गणेश चतुर्थी निमित्त घराघरात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. अनेकांच्या घरी आदल्या दिवशी बाप्पाची मूर्ती आणून ठेवली जाते. त्यामुळे मूर्तीला काही होऊन नये याची प्रत्येकजण काळजी घेत असते. पण अशातच जर त्या मूर्तीला चुकून धक्का लागला आणि काही विपरीत घडले तर घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. याचे कारण नुकतेच आदेश बांदेकर यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितले आहे. सुचित्रा आदेश बांदेकर आणि यांनी प्रेमविवाह केला होता. सुचित्राच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला नकार होता. पण तरीही या दोघांनी आपला संसार सुखाने थाटला.
आदेश बांदेकर यांचा स्ट्रगलचा काळ सुरू होता. अशातच सुचित्राच्या मावशीने त्यांना गणेशोत्सव काळात आमंत्रण दिले होते. सुचित्राच्या मावशीच्या घरी आदल्या दिवशीच गणपतीची मूर्ती आणली जाते. ती मुर्ती त्यांनी कपाटाच्या बाजूला ठेवली होती. गणेश चतुर्थीला गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची होती. आदेश बांदेकर तिथे जवळच बसले असताना भाग्यश्री नावाची चिमुरडी त्यांच्याजवळ आली आणि तिने लाईट लावायला सांगितली. आदेश बांदेकर लाईट लावायला उठले आणि त्यांचा धक्का त्या कपटाला लागला. जवळच असलेल्या मूर्तीला देखील यामुळे धक्का बसला आणि त्यातच मूर्तीचा हात आणि सोंड निखळून पडली. एकतर आदेश बांदेकर यांचे नैराश्याचे दिवस होते. त्यात पाहुण्यांच्या घरच्या मूर्तीला आपल्याकडून हानी झाली हे पाहून आदेश बांदेकर खूप घाबरून गेले.
तेवढ्यात भाग्यश्रीने त्यांना येऊन म्हटले की आता बाप्पा तुम्हाला शिक्षा करणार. भाग्यश्रीचे हे शब्द आदेश बांदेकरांच्या मनाला भिडले. त्यांनी ती बाप्पाची मूर्ती पाटासकट उचलली आणि त्यावर रुमाल टाकून अनवाणी रस्त्याने धावत सुटले. फडकेवाडी गणपती मंदिरात त्यांनी ही मूर्ती ठेवली आणि नतमस्तक होऊन समोरच असलेल्या गुरुजींना भयंकर अपराध झाल्याच्या भावनेने सल्ला विचारला. गुरुजींनी आदेश बांदेकर यांना शांत केले. आणि म्हणाले की काळजी करू नका या मूर्तीत अजून प्राणप्रतिष्ठा झालेली नाही त्यामुळे ही मूर्ती फक्त मातीची आहे. एवढे ध्यानात घ्या आणि मूर्तीला पाण्यात विसर्जित करा. गुरुजींनी दिलेला सल्ला ऐकल्यावर आदेश बांदेकर तसेच धावत सुटले, गिरगावच्या चौपाटीवर आल्यानंतर त्यांनी ती मूर्ती पाण्यात विसर्जित केली.
फडकेवाडीत अनवाणी धावत ते दुकानात जाऊन दुसरी मूर्ती शोधू लागले. कुठल्याच दुकानात मूर्ती शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले तेव्हा प्रचंड अस्वस्थता त्यांना जाणवू लागली. अखेर एका दुकानात एकच मूर्ती शिल्लक होती ती त्यांनी घेतली आणि सुचित्राच्या मावशीच्या घरी ते पोहोचले. दुपारी दीडच्या सुमारास उत्साही वातावरणात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. बाप्पा आपल्याला कुठली शिक्षा देणार हे मागे वळून जेव्हा ते पाहतात तेव्हा बाप्पाने आपल्याला प्रेमाची शिक्षा दिली असे ते म्हणतात. कारण या नंतर आदेश बांदेकर यांचा मराठी सृष्टीत प्रवेश झाला. त्यांचा हा यशाचा प्रवास गेली अनेक वर्षे चालू आहे. आपल्या हातून दरवर्षी चांगले काम घडून येते पुढच्याही वर्षी माझ्या हातून चांगले काम घडू दे अशीच मी देवाजवळ प्रार्थना करतो असे ते म्हणतात.