लोकप्रिय युट्युबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिने रविवारी सकाळी बॉयफ्रेंड वृषांक खनाल याच्या सोबत एंगेजमेंट केली असल्याचे जाहीर केले आहे. बोटात अंगठी घातलेला बॉयफ्रेंड सोबतचा एक खास फोटो प्राजक्ताने शेअर करताच सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला आहे. वृशांक खनाल आता माझा माजी प्रियकर आहे. असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. प्राजक्ता आणि वृशांक दहा वर्षाहुन अधिक काळापासून एकमेकांना डेट करत आहेत.
लवकरच हे दोघेही आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहेत. प्राजक्ता कोळी हिच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात. प्राजक्ता कोळी ही युट्युबर आहे, मजेशीर व्हिडिओमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. अशातच तिला ये शादी नहीं हो सकती, नियत, देसी डॉन अंडर अशा प्रोजेक्टमधून महत्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली. प्राजक्ता मूळची ठाण्याची. इथेच तिचे शालेय शिक्षण झाले. प्राजक्ताचे वडील मनोज कोळी हे रिअल इस्टेट क्षेत्रात आणि हॉटेल व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहेत. तर तिची आई अर्चना कोळी या शिक्षिका आहेत. ६ वी इयत्तेत शिकत असताना प्राजक्ताला रेडिओ जॉकी बनण्याची इच्छा होती.
रेडिओ जॉकी साठीच्या करिअरसाठी तिने प्रयत्न देखील केला. पुढे मास मिडियाचे शिक्षण घेतल्यानंतर ती युट्युबकडे वळली. यातूनच प्राजक्ता अमाप प्रसिद्धी मिळवू लागली. प्राजक्ता आणि वृशांक दोघेही कॉमन फ्रेंडमुळे एकत्र आले. दोघांनाही एकमेकांचा स्वभाव आवडू लागला. दहा वर्षांच्या डेट नंतर आता ते दोघेही सुंदर नात्याच्या बंधनात अडकले आहेत. त्यांच्या या निर्णयाचा घरच्यांनी आणि चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. मराठी तसेच हिंदी सेलिब्रिटींकडून तिच्यावर एंगेजमेंटमुळे अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.