महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने काही काळासाठी ब्रेक घेतलेला आहे. त्यामुळे अनेकजण या शोला मिस करत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ओंकार भोजनेला मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी ओंकारची निवड झाल्याने त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. खरं तर ओंकारकडे प्रमुख भूमिका असलेले मराठी चित्रपट चालून आले, सोबतच तो हिंदी चित्रपटातही झळकणार आहे. या व्यस्त शेड्युलमुळे आणि पुढे झेप घेता यावी म्हणून ओंकारने हे पाऊल उचलले होते. पण मधल्या काळात तो झी मराठीच्या फु बाई फु मध्ये दिसला. त्यानंतर मात्र ओंकार विरोधात अनेकांनी बोलण्यास सुरुवात केली.
पण एका कलाकाराला जर वेगळी संधी मिळत असेल तर त्याने ती जरूर स्वीकारावी असा त्याला पाठिंबा सुद्धा मिळू लागला. त्यामुळे प्रत्येक कलाकाराची मर्यादा तेवढ्यापुरतीच आखून न ठेवता त्याला मोकळीक दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येऊ लागली. अगदी महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील सचिन गोस्वामी यांनी देखील ओंकारचे कधीही या शो मध्ये स्वागत असेल असे म्हटले होते. त्यामुळे या कलाकारांमध्ये कुठलेही वाद नसल्याचे स्पष्ट झाले. वनिता खरातचे लग्न झाले त्यावेळी तिच्या लग्नात ओंकार का दिसला नाही अशी चर्चा सुरू झाली. मात्र यानंतर ओंकारने वनीताची प्रत्यक्षात भेट घेतली तेव्हा या चर्चेला पूर्णविराम मिळाला. पण अजूनही काही प्रेक्षकांच्या मनात ओंकार बद्दल अढी आहे.
नुकतेच हास्यजत्रा मधील नम्रता संभेराव हिने सोशल मीडियावर ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर सोबतचा एक फोटो शेअर केला. त्या फोटोवर नेटकऱ्याने आक्षेप घेत ओंकारला गद्दार म्हटले. ‘तू गद्दार आहेस ओंक्या, तू तुझ्या सर्व फॅन्स सोबत गद्दारी केली आहेस यार. मिस करतो यार आम्ही सगळे तुला. का सोडलीस हास्यजत्रा, निदान निमिष सारखं कधीतरी यायचं ना काही स्कीट्स साठी. ये एकदा परत, खूप आनंदी होऊ आम्ही सगळे तुला पुन्हा हास्यजत्रेत पाहून.’ नेटकऱ्याच्या या टिकेवर नम्रता संभेराव हिने सडेतोड उत्तर देताना म्हटले आहे की, ‘ते तसंच मुळीच नाहीये, त्याला फक्त नवीन गोष्टींचा शोध घ्यायचा होता. नवीन मार्ग नवीन उपक्रम आणि स्वतःचा शोध घ्यायचा होता. म्हणून आपण त्याच्या निर्णयांचा आदर केला पाहिजे आणि त्याला पाठिंबा दिला पाहिजे’.
नम्रताच्या या उत्तरावर अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. कलाकारांना जर संधी चालून येत असेल तर त्यांनी त्या स्वीकारायला हव्यात. केवळ एकाच गोष्टीत अडकून न राहता त्यांनी विविध पर्याय निवडून स्वतःची उन्नती करायला हवी. ओंकारने देखील स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर मोठमोठी कामं मिळवली. हे त्याचे एक यशच म्हणावे लागेल. तसेही सचिन गोस्वामी यांनी त्यांची दारं ओंकारसाठी कायम उघडी ठेवली आहेत. त्यामुळे कदाचित ओंकार महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये परत दिसला तर नवल वाटायला नको.