सोशल मीडियावर स्टार झालेली साईशा भोईर हिची आई पूजा भोईर हिला पोलीसांनी अटक केली आहे. ७ जुलै पर्यंत पूजा भोईर यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पूजा भोईर यांनी साईशाच्या इंस्टा अकाउंटवरून अनेकांशी ओळख केली होती. पैशांचे अमिश दाखवून पूजा भोईर यांनी अनेकांना आपल्या स्कीम मध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतर कुठलाही परतावा मिळत नसल्याचे पाहून लोकांनी पूजा भोईर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. मे महिन्यात पूजा भोईर यांना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर आता पुजाचा नवरा विशांत भोईर यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे साईशाच्या मालिकेत काम करण्यावर अडचणी निर्माण झाल्या आहेत. साईशा मालिकेत काम करण्यासोबतच शाळेतही जाते. त्यामुळे तिची खूप धावपळ होते. अशातच आईवडील दोघांनाही पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने साईशाला मालिकेत काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे साईशाने नवा गडी नवं राज्य या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील मालिकेतून साईशाने कार्तिकीची भूमिका गाजवली होती. त्यानंतर ती झी मराठीच्या नवा गडी नवं राज्य या मालिकेत चिंगीची भूमिका साकारताना दिसली. तिच्या या दोन्ही भूमिकांचे प्रेक्षकांकडून विशेष कौतुक केले गेले.

मात्र आई वडील दोघेही जवळ नसल्याने तिच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे साईशा आता या मालिकेचा भाग नसणार आहे. साईशाच्या जागी आता बालकलाकार आरोही सांबरे ही बालकलाकार नवा गडी नवं राज्य मालिकेत चिंगीची भूमिका साकारणार आहे. आरोही सांबरे ही सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवताना दिसली. त्यानंतर आरोहिला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून अभिनयाची संधी मिळाली. या मालिकेनंतर आरोही मुलगी झाली हो या मालिकेतून साजिरीच्या मुलीच्या भूमिकेत दिसली. मुलगी झाली हो या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर आरोही आता नवा गडी नवं राज्य मालिकेतून दिसणार आहे. चिंगीची भूमिका आरोहिसाठी आव्हानात्मक असली तरी ती तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकून घेईल असा विश्वास आहे.