केदार शिंदे दिग्दर्शित शाहीर साबळे हा चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत. या पाच दिवसात चित्रपटाने २.६८ कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमवला आहे. त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकवर्गाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. काल १ मे महाराष्ट्र दिनी चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या एकाच दिवशी चित्रपटाने १ कोटी ३० लाखांचा गल्ला आपल्या खात्यात जमवला आहे. शाहिरांवर चित्रपट बनवण्यासाठी केदारे शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली. सोबतच घरातील मंडळींनी देखील या चित्रपटाला हातभार लावलेला पाहायला मिळाला. चित्रपटाचे दिग्दर्शन शाहिरांचा नातू केदार शिंदे यांनी केले हे सर्वांनाच माहीत आहे.
चित्रपटाचे लेखन त्यांची मुलगी वसुंधरा साबळे यांनी केलेले आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वसुंधरा साबळे यांचा मुलगा ओंकार दत्त याने केले आहे. हे झाले पडद्यामागचे कलाकार मात्र शाहीर साबळे यांच्या मुली आणि पत्नीची भूमिका त्याच्याच कुटुंबातील सदस्यांनी केलेली आहे हे खूप कमी जणांना माहीत आहे. केदार शिंदेने प्रथमच आपल्या घरातील सदस्यांना ही अभिनयाची मोठी संधी देऊ केल्याने त्यांच्यासाठी हे खरं तर एक आव्हानच होतं. शाहीर साबळे यांना चार अपत्ये. देवदत्त, यशोधरा, वसुंधरा आणि चारुशीला. चित्रपटात शाहिरांच्या पत्नीची भूमिका त्यांची पणती सना शिंदे हिने निभावलेली आहे. तर मुलगी वसुंधराची भूमिका नातसून युगेशा दत्त हिने साकारली आहे जी वसुंधरा साबळे यांचीच सून आहे. युगेशा ही कॉस्टयूम डिझायनर आहे.
वसुंधरा मावशीची भूमिका तूच साकारणार हे केदारने तिला सांगितले होते. आपल्या सासूची भूमिका साकारण्याचे आव्हान युगेशाने अगदी सहज पेलले हे तिच्या अभिनयातून तिने दाखवून दिले आहे. तर अभिनेत्री चारुशीला साबळे वाच्छानी यांची भूमिका त्यांची स्वतःची मुलगी युहाना वाच्छानी हिने निभावलेली आहे. युहाना ही अभिनेत्री आहे, तिने २००७ सालच्या जबरदस्त चित्रपटात अभिनय केला होता. गुजराथी नाटकातून युहाना अभिनेत्री म्हणून चांगली लोकप्रियता मिळवत आहे, सोबतच डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम करत आहे. महाराष्ट्र शाहीर चित्रपटात युहानाने आपल्या आईचीच व्यक्तिरेखा साकारलेली आहे. त्यामुळे ही भूमिका करणे तिच्यासाठी मुळीच अवघड नव्हते. युगेशा ही केदार शिंदेच्या मावशीची सून तर युहाना ही मावस बहीण आहे.
केदारने दाखवलेल्या विश्वासावर या दोघी बहिणी अभिनयात खऱ्या उतरल्या अशी प्रतिक्रिया केदार रोखठोक देताना पाहायला मिळते. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट बनवण्यासाठी केदार शिंदे यांना ७ कोटींचा खर्च आला. अवघ्या पाच दिवसात या चित्रपटाने २.५० कोटींचा टप्पा पार केलेला असल्याने हा चित्रपट झालेला खर्च लवकरच भरून काढणार अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया देत चित्रपट आवडला असल्याचे सांगितले आहे. गीतकार राजा बढे, संगीतकार श्रीनिवास खळे आणि पहाडी आवाज लाभलेले पद्मश्री शाहीर कृष्णराव गणपत साबळे यांच्या त्रिवेणी संगमाने महाराष्ट गीताचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.