महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट येत्या २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच्या पिढीला शाहीर साबळे कसे होते, त्यांचा जीवनप्रवास किती खडतर होता याचा उलगडा होणार आहे. शाहीर साबळे म्हणजेच कृष्णा साबळे यांचे बालपण अमळनेर येथील आजीकडे गेले. कृष्णाने गाण्यापासून दूर राहावे म्हणून आजीने तापत्या तव्यावर ठेवले होते. अगदी सातवीच्या फायनलच्या परीक्षेला तीन रुपये लागत असताना आजीने ते देण्यासही नकार दिला होता. चित्रपटात या कडक आजीची भूमिका अभिनेत्री निर्मिती सावंत निभावताना दिसणार आहे. शाहीर साबळे यांच्या सहवासात आलेल्या अनेक कलाकारांनाही त्यांच्या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.
केदार शिंदे, भरत जाधव, संतोष पवार एवढेच नाही तर आदेश बांदेकर यांच्याही कलासृष्टीची सुरुवात त्यांच्याच लोकधारामधून झालेली होती. आदेश बांदेकर चित्रपटाबद्दल भरभरून बोलताना म्हणतात की, माझ्या तर आयुष्याची सुरुवात महाराष्ट्राची लोकधारामधील बाल्यानृत्याने झाली होती. गिरणगावातील हे एक मोठं व्यक्तिमत्व होतं जे साऱ्या जगावरती आपला ठसा उमटवत होती. त्यामुळे त्यांच्याबद्दलचं एक वेगळं आकर्षण होतं. त्या संस्कारांमध्ये, त्या शिस्तीमध्ये आमच्या व्यावसायिक आयुष्याला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचं नातं बाबा म्हटलं की त्यातच आलेलं आहे. कारण जेव्हा आम्ही बाबा म्हणू तेव्हा तो धाक, तो आदर आणि जे करू ते उत्तम करू हे ह्यातूनच आलेली आहे. उत्तम संस्कारांचा पाया मिल मजदूर संघामध्ये रचला गेला आणि तिथून हा प्रवास सुरु झाला.
सूर्य उगवला प्रकाश पडला, विंचू चावला ही भारुडं पुस्तकातून लोकांच्या मनामध्ये पोहोचवली. आणि जनमानसावरती एक वेगळा ठसा उमटवला. त्यामुळे शाहिरांनी गायलेलं प्रत्येक गाणं हे आम्हा सर्वांचं अत्यंत आवडीचं आणि जिव्हाळ्याचं आहे. काय योगायोग असतो ते माहीत नाही मात्र केदारने एक मोठं स्वप्न बघितलं. ते स्वप्न आधीच्या पिढीला पुढच्या पिढीने बघत असताना कित्येक पिढ्यासाठी हा अभ्यास होणार आहे. ते स्वप्न पूर्ण होत असताना त्याचवर्षी त्या गीताला राज्यगीताचा मान मिळतो, हा खूप मोठा आशीर्वाद आहे बाबांनी केदारला दिलेला. ही स्वप्नपूर्ती आपल्या सगळ्यांची आहे. या एवढ्या सगळ्या गोष्टींचा आम्ही कुठेतरी एक छोटासा भाग बनतोय याचा आनंद फार वेगळा आहे. खऱ्या अर्थाने जर शाहीरांचा सन्मान करायचा असेल तर प्रत्येकाने कुटुंबासह हा चित्रपट जाऊन बघायला पाहिजे.