नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे मराठी सृष्टीतील दिग्गज मंडळी. हमीदाबाईची कोठी या नाटकासोबतच त्यांनी आणखी दोन चित्रपटातून एकत्रित काम केले होते. नाटकाचा एक प्रयोग रद्द करण्यात आला त्यावेळी प्रेक्षक चिडले. अशोक सराफ यांना मारायला धावतील म्हणून नाना पाटेकर यांनी हाताला धरून पळवत नेले होते. मग रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या सायकल रिक्षा चालवणाऱ्याला अशोक सराफ जवळ बसवून स्वतः रिक्षा चालवून त्यांना हॉटेलमध्ये नेउन सोडले. आणि अंगातला शर्ट काढून हाफ चड्डी घालून पुन्हा त्या गर्दीत जाऊन नाटकानिमित्त आलेल्या कलाकारांच्या मदतीला धावून गेले. असे बिनधास्त नाना अशोक सराफ यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध जुळवताना दिसले.
हमीदाबाईची कोठी नाटकाच्या एका प्रयोगासाठी नाना पाटेकर यांना त्यावेळी ५० रुपये मिळायचे. तर अशोक सराफ यांना २५० रुपये मिळायचे. पण पुढे कधी प्रयोग नसायचे त्यावेळी अशोक सराफ सोबत पत्ते खेळायचे. नाना पाटेकर यांना पैशांची गरज आहे हे पाहून अशोक सराफ पत्त्यांच्या डावात मुद्दामहून ५, १० रुपये हरायचे. नाना पाटेकर यांना हे कळून चुकले होते की अशोक हे डाव मुद्दाम हरतोय पण पैशांची गरज असल्याने तेही पैसे घ्यायचे. एकदा गणपतीच्या उत्सवासाठी नाना पाटेकर यांना ३ हजार रुपयांची गरज होती. आपला मित्र अशोककडे त्यांनी ही मदत मागितली. त्यावेळी अशोक सराफ शूटिंगला निघाले होते. एक कोरा चेक नानांच्या हातात ठेऊन बँकेच्या खात्यात १५ हजार रुपये आहेत तुला पाहिजे तेवढी रक्कम काढ. असे म्हणून ते पुढे शूटिंगला निघून गेले.
नानांनी चेकमध्ये गरजे इतक्याच रुपयांची इतकीच रक्कम लिहिली. सावित्री चित्रपटात नाना पाटेकर यांना पैसे मिळाले. पैसे पुन्हा परत करण्यासाठी ते तीन हजार रुपये घेऊन गेले. तेव्हा काय पाटेकर तुम्ही लई पैसेवाले झाले, अशी प्रतिक्रिया अशोक मामांनी दिली. नानांनी छान उत्तर दिले की, पैसेच परत देतोय वेळ नाही परत देऊ शकत. नाना आणि अशोक मामा एकत्र काम करायचे तेव्हा नाना अशोक यांचे पाय चेपून द्यायचे. डोक्याला तेल लावून मालिश करून द्यायचे, याचे अशोक मुद्दाम ५ रुपये द्यायचे. पूढे अनेकदा हे असेच भेटले की नाना लगेचच अशोक सराफ यांचे पाय चेपून देऊ लागले. असे अनेक गमतीजमती किस्से या दिग्गज कलाकारांचे आहेत. या साधेपणात आणि एकमेकांना समजून घेण्याच्या प्रव्रुत्तीमुळेच ते प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.