रिलायन्स जिओच्या मोबाईल टीव्ही ऍपने क्रिकेट चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध करून दिली आहेत. ज्यात १२ भाषांमध्ये आयपीएल २०२३ च्या स्ट्रीमिंगचा समावेश आहे. जिओ सिनेमा हा आयपीएल २०२३ साठी अधिकृत डिजिटल भागीदार बनला आहे. त्यामुळे जिओ सिनेमा तब्बल १२ वेगवेगळ्या भाषांमध्ये कॅश रिच लीगची १६ वी आवृत्ती स्ट्रीम करत आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, भोजपुरी, बंगाली, पंजाबी, ओरिया, मल्याळम, कन्नड, तमिळ आणि तेलुगु या १२ भाषांमध्ये समालोचन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही गोष्ट क्रिकेट चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी जिओने नक्कीच एक चांगली कल्पना समोर आणली.
तथापि, जिओ सिनेमावरील आयपीएलचे मराठी भाषेत समालोचन हे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य बनले आहे. कारण मराठमोळ्या समालोचकांनी आयपीएल २०२३ च्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. मराठी भाषेतून कॉमेंट्री करणारा कुणाल दाते सध्या मोठी लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. आपल्या मातृभाषेतून समालोचन ऐकण्याची मज्जा काही वेगळीच आहे. अशा प्रतिक्रिया क्रिकेट प्रेमींकडून त्याला मिळत आहेत. नुकतेच कुणाल दाते सोबत सिद्धार्थ जाधव, शिव ठाकरे आणि जहीर खान यांनी मराठीतून समालोचन केले. त्यावेळी सिध्दार्थची डायलॉगबाजी आणि अस्सल मराठी शब्दांची फटकेबाजी पाहून प्रेक्षकांना खूप मज्जा आली. सिद्धार्थ समालोचन करत असताना प्रत्येक खेळीवर मजेशीर प्रतिक्रिया देत होता.
चेंडू गेला आहे वावराच्या पल्याड, या समालोचनाने प्रत्येकाला गावच्या क्रिकेटची आठवण आली असेल. तर जहीर खान आणि शिव ठाकरेने देखील मराठीतून समालोचन केलेले पाहून प्रेक्षकांना आपलेपणा जाणवला. सिद्धार्थ आणि शिव यांच्यासह आणखी बरेचसे मराठी कलाकार समालोचन करताना पाहायला मिळाले. अभिनेत्री पूर्वी भावे, केदार जाधव, धवल कुलकर्णी, किरण मोरे, सिद्धेश लाड, चैतन्य संत, प्रसन्न संत यांनीही उत्तम समालोचन केलेले पाहायला मिळाले. मराठी समालोचनाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. बहुतेक प्रेक्षक आता हिंदी, इंग्रजी भाषेपेक्षा मराठीतून होणाऱ्या समालोचनाला पसंती दर्शवत आहेत. मराठी भाषेचा एक आपलेपणा वाटतो. त्यामुळे यात आणखी आगरी, वऱ्हाडी तसेच कोल्हापूरी आणि कोकणी भाषेतूनही समालोचन ऐकायला आवडेल अशा प्रतिक्रिया मिळू लागल्या आहेत.