काल रविवारी हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनचा ग्रँड फिनाले पार पडला. हा सिजन प्रेक्षकांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून ठेवताना दिसला होता. कारण मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे या शोमध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करून होता. शिवने शो जिंकण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. त्यामुळे टॉप ५ च्या यादीत प्रवेश करताच प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला होता. बिग बॉसच्या १६ व्या सिजनच्या फायनलिस्ट मध्ये शालीन भनोट, अर्चना गौतम, एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि प्रियांका चाहर चौधरी यांनी स्थान मिळवले होते. यावेळी शालीनला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
तर अर्चना गौतम हिने चौथ्या क्रमांकावर आपले नाव नोंदवले. यानंतर शिव, प्रियांका आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढत झाली. यावेळी प्रियांका टॉप दोन मध्ये येऊ शकते असा विश्वास असतानाच तिला शोमधून बाहेर पडावे लागले. त्यानंतर बिग बॉसच्या ट्रॉफीवर पुण्याच्या एमसी स्टॅनने आपले नाव कोरले. बिग बॉसच्या ट्रॉफीसह त्याला ३१ लाखांचा धनादेश देण्यात आला. मात्र शिव दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून प्रेक्षकांनी शिव ठाकरे जिंकावा म्हणून त्याला वोटिंग केले होते. एवढेच नाही तर नेते मंडळींनी सुद्धा शिव जिंकावा म्हणून प्रेक्षकांना आवाहन केले होते. त्यामुळे विजेता शिव ठाकरे असेल असे सगळ्यांनाच वाटत होते.
दरम्यान बिग बॉसच्या घरात असताना शिवने जीवतोड मेहनत घेतली होती, तो सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत होता. अगदी टास्कमध्ये सुद्धा त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली पाहायला मिळाली होती. प्रियांका सुद्धा याबाबत उजवी ठरली होती. या दोघांपैकी कोणीतरी विजेता होईल असे वाटत असतानाच एमसी स्टॅनने विजयाची ट्रॉफी जिंकली आणि अनपेक्षित निकाल प्रेक्षकांच्या हाती लागला. खरं तर एमसी स्टॅन त्याच्या गाण्यांमुळे तरुणाईत मोठा लोकप्रिय ठरला असला तरी तो बिग बॉसच्या घरात कधीच कुठे दिसला नव्हता. शालीन सोबत एक दोनवेळा झालेल्या भांडणामुळे तो चर्चेत आला. मात्र त्याने या घरात प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला असे कुठेच दिसले नाही. त्यामुळे या अनपेक्षित निकालाचा प्रेक्षकांनी रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
एमसी स्टॅन पुण्याचा आहे मात्र बिग बॉसच्या ट्रॉफीचा तो हकदार होऊ शकतो यावर अनेकांना शंका आहे. त्याची प्रसिद्धी पाहता त्याला मोठ्या संख्येने मतं मिळाली असली तरी खरा विजेता शिव ठाकरे आहे असे मत व्यक्त केलं जात आहे. मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा निकाल सुद्धा असाच अनपेक्षित मिळाला होता. अक्षय केळकर विजेता झाल्यावर अनेकांनी बिग बॉसच्या निर्णयावर नाराजी दर्शवली होती. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा स्पर्धक या शोमध्ये विजेता व्हावा अशी एक माफक अपेक्षा असते. मात्र ही अपेक्षा हिंदी मराठी अशा दोन्ही बिग बॉसने भंग केली असल्याने आता सर्वच स्तरातून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.