झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा रविवारी २२ जानेवारी रोजी अखेरचा भाग प्रसारित करण्यात आला. या मालिकेने निरोप घेताच प्रेक्षकांनी मात्र त्यातील कलाकारांना मिस करणार अशी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम तर दिलेच मात्र त्यातील प्रत्येक कलाकाराला एक वेगळी ओळख मिळवून दिली. यश आणि नेहा प्रमाणेच मालिकेतील सहाय्यक कलाकारांवर सुद्धा प्रेक्षकांनी प्रेम केले, त्यामुळे मालिकेला निरोप देताना कलाकारच नव्हे तर प्रेक्षक देखील भावुक झाले.
मात्र आता माझी तुझी रेशीमगाठ मालिकेने जरी निरोप दिलेला असला तरी ही कलाकार मंडळी लवकरच काहीतरी नवीन घेउन तुमच्या समोर उपस्थित राहणार आहेत. या नवीन प्रोजेक्टबाबत कलाकार मंडळींनी नुकतीच एक घोषणा केलेली आहे. प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे आणि अजय मयेकर यांनी लाईव्ह येत नवीन प्रोजेक्ट बाबत थोडीशी हिंट दिली होती. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत संकर्षण, श्रेयस आणी प्रार्थना यांचे छान बॉंडिंग जुळून आले होते. या तिघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना सुद्धा विशेष भावली होती. याच अनुषंगाने आता मालिकेच्या दिग्दर्शकाला सोबत घेऊन त्यांनी लवकरच काहीतरी घेऊन येतोय असे जाहीर केले. अजय मयेकर यांनी आजवर अनेक उत्तमोत्तम कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत.
आगामी प्रोजेक्टसाठी तेच दिग्दर्शनाची भूमिका साकारणार आहेत तर श्रेयस आणि प्रार्थना उत्तम अभिनय करतात. तसेच त्यांनीच या नव्या प्रोजेक्टच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. संकर्षण उत्कृष्ट अभिनयासोबतच लेखन सुद्धा छान करतो. संकर्षण आगामी प्रोजेक्टचे कथानक आणि संवाद लेखनाचे सुद्धा काम करणार आहे. आपल्या नव्या प्रोजेक्ट बद्दल हिंट देताना या सर्वांना माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा सिकवल येणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र याचे उत्तर लवकरच तुम्हाला मिळेल असे म्हटले असल्याने त्यांनी ही बाब अजून तरी गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले आहे. असे असले तरी छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा हे त्रिकुट पाहायला मिळो अशी आशा प्रेक्षकांनी व्यक्त केलेली आहे.