कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. शो येत्या ८ जानेवारी रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉस सोबतच कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे समोर आले आहे. मालिकेत आता देवाच्या आईची एन्ट्री झाली, ही भूमिका अभिनेत्री गार्गी फुले यांनी साकारली आहे. त्यांना लतिका सून म्हणून पसंत आहे आणि म्हणूनच तिचे देवासोबत लग्न व्हावे म्हणून प्रयत्न करत आहेत. याचसाठी लतीकाला २५ हजारांची साडी देखील देऊ केली होती, हे सत्य लतीकाला देखील समजणार आहे.
लतीकाचा संसार आता देवासोबत होणार असल्याचे मालिकेत दिसून येत आहे. त्यामुळे लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेतील अभिनेत्री अदिती द्रविड हिने एक्झिट घेतली होती. या पात्राला आता पुरेसा वाव नसल्याने तिला मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे मात्र आपण लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येऊ अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेचा शेवटचा एपिसोड ७ जानेवारी २०२३ रोजी प्रसारित केला जाणार आहे. त्यानंतर या मालिकेच्या जागी रात्री ९ वाजता रमा राघव ही नवी मालिका प्रसारित होत आहे. रमा राघव मालिका एका कन्नड मालिकेचा रिमेक आहे. यात अभिनेत्री ऐश्वर्या शेट्ये रमाची भूमिका साकारणार आहे.
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील सिम्मी काकू म्हणजेच शीतल क्षीरसागर आणि सई रानडे देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेली सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचे लवकरच चित्रीकरण पूर्ण होत आहे. अभि आणि लतिकाच्या आगळ्या वेगळ्या प्रेमाची ही कहाणी, अक्षया नाईक आणि समीर परांजपे यांनी समर्थपणे सांभाळली होती. अभिच्या मृत्यूनंतर लतिका तिच्या लेकीचा सांभाळ करत होती. आता त्या दोघींना देवाची साथ मिळणार आहे. देवासोबत लतीकाची मैत्री झाली असली तरी त्याच्याकडून लग्नाचा आलेला प्रस्ताव ती स्वीकारणार असल्याने मालिकेचे कथानक संपणार आहे. याबाबत सविस्तर माहिती लवकरच मालिकेकडून दिली जाईल.