स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि म्हणूनच या मालिकेच्या माध्यमातून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी आपल्या वेड चित्रपटाचे प्रमोशन करण्याचे ठरवले आहे. नुकतेच या मालिकेच्या सेटवर जेनेलिया देशमुखने हजेरी लावली होती. त्यानिमित्ताने एका पाहुण्या कलाकाराची भूमिका ती या मालिकेतून साकारताना दिसणार आहे. जेनेलियाची मराठी मालिकेतली एन्ट्री कशी ठरणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेला वेड हा मराठी चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
चित्रपटात रितेश आणि जेनेलिया प्रमुख भूमिका साकारणार आहेत. लई भारी या चित्रपटात जेनेलिया एका गाण्यापूरती मर्यादित भूमिकेत दिसली, मात्र वेड च्या माध्यमातून ती मराठी सृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. वेड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश आणि जेनेलियाने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही ठिकठिकाणी जाऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. यानिमित्ताने तिचे मराठी मालिका सृष्टीतही पदार्पण झालेले पाहायला मिळणार आहे. जेनेलिया प्रथमच मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने एपिसोडची उत्सुकता सगळ्या प्रेक्षकांना लागली आहे. वेड चित्रपटात जेनेलियाचा जसा गेटअप आहे अगदी तशाच साध्यासुध्या वेशभूषेत मालिकेत प्रवेश करणार आहे.
एपिसोडचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून येत्या काही दिवसातच तुम्हाला ते मालिकेतून पाहायला मिळणार आहे. मालिकेतील कार्तिकी म्हणजेच मैत्रेयी दाते हिने जेनेलिया सोबतचा एक क्युट फोटो शेअर केला आहे. जेनेलियाला प्रत्यक्षात आपल्या समोर पाहून आणि सोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मैत्रेयी खूपच खुश झाली आहे. सध्या रंग माझा वेगळा या मालिकेत आयेशा प्रेग्नंट नाहीये हे सत्य कार्तिकला समजले आहे. त्यामुळे या मालिकेला एक रंजक वळण मिळाले आहे. डॉ कुणालने हे रिपोर्ट बदलले होते, हे त्याने सगळ्यांसमोर उघड केले आहे. श्वेता आणि आयेशाचा प्लॅन इथे पूर्णपणे चिघळला आहे. त्यामुळे रंग माझा वेगळा या मालिकेतील आणखी एक पर्व संपल्याने प्रेक्षकांनी निश्वास टाकला आहे.