अभिनयाच्या जोडीला स्वतःचा व्यवसाय देखील असावा असे अनेक कलाकारांना वाटते. बहुतेक कलाकारांनी कपड्यांचा ब्रँड सुरू केलेला पाहायला मिळतो. तर काही कलाकारांनी हॉटेल व्यवसायाकडे आपली पाऊलं वळवली. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री सिया पाटील ही वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये जोडली गेलेली पाहायला मिळाली आहे. सिया पाटील हिने एक दोन नव्हे तर चक्क चार पाच वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये उतरण्याचे धाडस दाखवले आहे. मात्र तिचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. कारण अभिनयाच्या ओढीमुळे ती पुण्यात दाखल झाली आणि इथूनच तिने पेट्रोल पंपावर नोकरी करत, लहान मुलांच्या शिकवण्या घेत शून्यातून विश्व निर्माण करण्याचे ठरवले.
सियाचे वडील दिवंगत शंकरराव पाटील हे द्राक्षबागायतदार असूनही तिने त्यांच्याकडून कुठलीच पैशाची अपेक्षा ठेवली नाही. तिचा हाच प्रामाणिकपणा तिला तिच्या यशाच्या प्रवासासाठी उपयोगी ठरला. केवळ अभिनय क्षेत्रापुरते मर्यादित न राहता तिने मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःचे सलून आणि हॉटेल व्यवसायास सुरूवात केले. मिलेनियम पॅराडाईज, ठाकूर व्हिलेज, कांदिवली पश्चिम, मुंबई येथे तिने S Sense salon and spa सुरु केले. चांदीवली स्टुडिओ जवळ ‘गाव curry चव महाराष्ट्राची’ या नावाने तिने हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. त्याअगोदर भावाच्या मदतीने सियाने शिर्डी येथे Shion Green Energy हा पर्यावरण पूरक व्यवसाय सुरू केला होता. शेतकऱ्यांना या व्यवसायातून आर्थिक लाभ व्हावा हाच यामागचा मुख्य उद्देश होता.
हॉटेल व्यवसायाला मिळत असलेला खवय्यांचा प्रतिसाद पाहून सियाने आणखी एक हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. ३० नोव्हेंबर रोजी ‘तवस रेस्टॉरंट’ च्या उद्घाटनाला तिने महेश मांजरेकर यांना आमंत्रण दिले होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री मेघा धाडे आणि ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी देखील उपस्थिती लावून सियाचे कौतुक केले. तवस हे रेस्टॉरंट देखील चांदीवली फिल्म स्टुडिओच्या जवळच आहे. इथेच तिचे गाव curry या नावाचे पहिले हॉटेल देखील आहे. सियाची ही व्यवसाय क्षेत्रातली प्रगती पाहून मराठी सेलिब्रिटींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच तिच्या हॉटेलला आवर्जून भेट देऊ असेही अनेकांनी म्हटले आहे. सिया पाटील सध्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम प्रेक्षकांच्या भेटीला येते.
सियाने प्लेन चालवण्याचे देखील धडे गिरवले आहेत त्यामुळे ती एक प्रोफेशनल पायलट आहे असे म्हणायला हरकत नाही. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना तिने स्वबळावर मराठी चित्रपट सृष्टीत ओळख बनवली होती. गर्भ, बोला अलख निरंजन, डोंबिवली रिटर्न, पारख नात्यांची, धूम २ धमाल, गाव थोर पुढारी चोर, चल धर पकड अशा अनेक चित्रपटाच्या माध्यमातून ती कधी मुख्य भूमिकेत तर कधी सहाय्यक भूमिकेत दिसली. मात्र आता व्यवसाय क्षेत्रात उतरलेल्या सियाने इथेही कमाल कामगिरी करून प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला आहे.