मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ उभारण्यास ज्या कलाकारांचा हात लागला त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचा मोठा हातखंडा आहे. मात्र त्यांना ही ओळख मिळवून देण्यामागे देखील सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांचा हात आहे असेच म्हणावे लागेल. या दोघांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आणि अनेक दर्जेदार चित्रपट मराठी सृष्टीला मिळवून दिले. महेश कोठारे यांच्या प्रत्येक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांना आवर्जून संधी दिली जायची. खरं तर आणखी असे काही कलाकार होते जे महेश कोठारे यांच्या चित्रपटाचे महत्वाचे भाग बनून गेले, ते म्हणजे विजय चव्हाण आणि बिपीन वर्टी.
कोठारेंच्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या चित्रपटांना पाच अक्षरी नावं देत. अर्थात या पाच अक्षरी नावांमध्येही भन्नाट कल्पना सुचवण्याचे त्यांनी धाडस केले. धुमधडाका हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटाचे आणि पछाडलेला या चित्रपटाचे एक कनेक्शन नुकतेच श्रेयस तळपदे याने सांगितले आहे. धुमधडाका हा चित्रपट १९८५ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील एका सीनमध्ये अशोक सराफ प्रेयसीला भेटायला जातात, त्यावेळी अंगावर काळ्या रेघांचा पांढरा शर्ट पहायला मिळतो. नेमका हाच शर्ट महेश कोठारे यांनी पछाडलेला या चित्रपटातही वापरला होता याची गोड आठवण श्रेयस तळपदेने करून दिली आहे. २००४ साली श्रेयस तळपदेची प्रमुख भूमिका असलेला पछाडलेला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.
अशोक सराफ यांचा त्या शर्टमधला फोटो आणि पछाडलेला मध्ये एका सिन दरम्यान श्रेयसने घातलेला शर्ट एकच आहे याची आठवण त्याने शेअर केली. म्हणजे जवळपास १९ वर्षानंतरही महेश कोठारे यांनी चित्रपटाची प्रॉपर्टी तशीच जपून ठेवलेली होती. महेश कोठारे यांच्या याच विचारांचे श्रेयसने मोठे कौतुक केलेले पाहायला मिळते. या शर्टची गंमत सांगताना श्रेयसने दोन्ही चित्रपटातील सिन पोस्ट केले आणि त्यात हा शर्ट एकच असल्याचा उल्लेख केला. हे शेअर करण्यामागचं श्रेयसचं कारण एवढंच होत की, महेश सरांनी हा शर्ट अजूनही जपून ठेवला असेल याची श्रेयसला खात्री आहे कारण “महेश सर फक्त वस्तूच नाही तर नाती सुद्धा तितक्याच प्रेमाने जपतात”. चित्रपटात संधी दिल्याबद्दल महेश कोठारे यांचे मनापासून धन्यवाद मानतो.