बिग बॉसचा शो नेहमी वादग्रस्त ठरत असला तरी देखील ह्या शोला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. कलर्स मराठीवर लवकरच बिग बॉसचा ४ था सिजन सुरू होत आहे. या शोचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा महेश मांजरेकरच निभावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिग बॉसच्या ४ थ्या सिजनच्या घराचा लूक काही दिवसांपूर्वीच मीडिया माध्यमातून व्हायरल करण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती. ह्यावेळी १६ सहभागी स्पर्धक कोण असतील याची चर्चा सुरू असतानाच, एका अभिनेत्याबाबत शिक्कामोर्तब केलेला पाहायला मिळतो आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील बायको अशी हवी या मालिकेत विकास पाटील मुख्य भूमिकेत दिसला होता.
मालिकेतून एक्झिट घेऊन तो बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये दाखल झाला होता. मालिकेतून एक्झिट घेतल्याबरोबर या मालिकेने देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता कलर्स मराठीवरील अशाच एका मालिकेतून नायकाची एक्झिट करण्यात आली आहे. त्यामुळे हा नायक बिग बॉसच्या घरात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले पाहायला मिळत आहे. ही मालिका आहे सुंदरा मनामध्ये भरली. या मालिकेने काही वर्षांचा लीप घेतला आहे. यात अभिमन्यूचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अभिमन्यू नंतर लतिका आपल्या लेकीचा सांभाळ करताना दर्शवली आहे. मालिकेतला हा ट्विस्ट असेच काहीसे संकेत देताना दिसत आहे. अभिमन्यूची अचानक एक्झिट याच कारणामुळे झाली असावी. त्यामुळे मालिकेच्या कथानकात मोठा बदल करावा लागला असल्याचे आता बोलले जात आहे.
अभिमन्यूची भूमिका समीर परांजपे याने अभिनयाने चांगलीच वठवली होती. या दोघांची आगळी वेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांना विशेष भावली होती. अभिमन्यू आता या मालिकेत दिसणार नसल्याने प्रेक्षकांनी मात्र नाराजी दर्शवली आहे. कथानक पुढे सरकवण्यासाठीच मालिकेने लीप घेतला असल्याचे दिसून येते. तूर्तास समीर परांजपे हा मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनचा पहिला स्पर्धक असेल असा शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे समीर ह्या बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांच्या समोर स्वतःची ओळख कशी बनवेल याची जास्त उत्सुकता आहे. हार्दिक जोशी, अलका कुबल, रुचिरा जाधव, तुषार गोसावी, तेजश्री जाधव हे सेलिब्रिटी सहभागी होतील असे बोलले जात आहे. ही संभाव्य यादी असली तरी त्यांच्या नावावर खात्रीशीर शिक्कामोर्तब केला असल्याचे सांगण्यात येत आहे.