नावात काय आहे? असे शेक्सपिअर म्हणून गेला असला तरी बहुतेक कलाकार मंडळी आपले आडनाव लपवण्यासाठी नावात बदल घडवून आणतात. मराठी सृष्टीतील बरीचशी कलाकार मंडळी आपल्या नावासमोर आडनाव लावत नाहीत. अर्थात रसिका सुनील धबडगावकर, अमृता सुभाष ढेंबरे, ललित प्रभाकर भदाणे अशी आडनाव असल्यामुळे ही कलाकार मंडळी नावापुढे वडिलांचे नाव लावतात. बॉलिवूड सृष्टीत तर अनेक कलाकार मंडळी आपली मूळची ओळख लपवण्यासाठी नावातच बदल करतात. आता बॉलिवूड सृष्टीत पदार्पण करायचे म्हटल्यावर त्याला साजेशा नावाची विचारसरणी पुढे आलेली पाहायला मिळत आहे.
प्रसिद्ध अभिनेते मधुकर तोरडमल यांची लेक तृप्ती तोरडमल हिने देखील आपल्या नावात बदल केलेला पाहायला मिळतो आहे. आणि त्याला देखील असेच काहीसे कारण आहे. मधुकर तोरडमल हे नाट्य सृष्टीतील मामा तोरडमल म्हणून ओळखले जात. हाच सूनबाईचा भाऊ, तरुण तुर्क म्हातारे अर्क, झुंज, किनारा, चांदणे शिंपित जाशी या आणि अशा कितीतरी नाटक, चित्रपटातून त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. २ जुलै २०१७ रोजी प्रदीर्घ आजाराने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी तृप्ती तोरडमल हिने अभिनयाचा वारसा जपलेला पाहायला मिळाला. सविता दामोदर परांजपे या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती.
या चित्रपटात राकेश बापट आणि सुबोध भावे सोबत तिला प्रथमच अभिनयाची संधी मिळाली होती. फत्तेशीकस्त या चित्रपटात तिने रायबागन हिची भूमिका साकारली होती. मात्र आता तृप्ती बॉलिवूड सृष्टीत पदार्पणास सज्ज झाली आहे. १२ जानेवारी २०२३ रोजी तृप्ती अभिनित करत असलेला आदीपुरुष हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी तिने आपल्या नावात बदल केला आहे. तृप्ती तोरडमल हे नाव हटवून तिने आयेशा मधुकर असे नाव सोशल अकाउंटवर केले आहे. नावात बदल केल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. यामागचे कारण देखील तिने सांगितले आहे. तृप्तीला खूप अगोदरच आपल्या नावात बदल करायचा होता.
आयेशा हे तिचे जन्मपत्रिकेत असलेले नाव आहे. सविता दामोदर परांजपे चित्रपटावेळी तिला नाव बदलायचे होते, पण तोपर्यंत उशीर झाला होता. तेव्हा तृप्ती तोरडमल या नावानेच तिने मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. मात्र आता आदीपुरुष चित्रपटात पदार्पण करत असल्याने तृप्तीने आपल्या नावात बदल केला आहे. तिच्या नावात बदल करण्यावरून सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.