शाहीर साबळे यांच्या जीवनपटावर भाष्य करणारा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे नाव जाहीर करताच शाहीर साबळेंच्या भूमिकेत कोण झळकणार अशी चर्चा रंगली होती. त्यावेळी अंकुश चौधरीच ही भूमिका साकारणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते. शाहीर साबळे यांच्या गेटअप मधला अंकुशचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी अंकुशचा लूक सेम शाहीर साबळेंशी मिळताजुळता पाहायला मिळाला. ह्याचे क्रेडीट सर्वस्वी मेकअप आर्टिस्टचे असल्याचे केदार शिंदे यांनी स्पष्ट केले होते. कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या जीवनप्रवासात अनेकांचा सहवास त्यांना लाभला.
महत्वाचं म्हणजे त्यांच्या सहचारिणीची भूमिका कोण साकारणार याचाही उलगडा झालेला पाहायला मिळतो आहे. शाहीर साबळेंच्या पत्नी सौ भानुमती कृष्णराव साबळे यांची भूमिका त्यांचीच पणती म्हणजेच नातू केदार शिंदे यांची लेक ‘सना शिंदे’ झळकताना दिसणार आहे. आपल्या पणजीची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे खरं तर मोठ्या भाग्याचं काम. या भूमिकेतून सना मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. या भूमिकेबाबत केदार शिंदे यांनी म्हटले आहे की, आज ३ सप्टेंबर. शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं. सौ भानुमती कृष्णराव साबळे आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती ‘सना केदार शिंदे’.
पणजीच्या भूमिकेत पणती. शाहीरांचा हा झंझावाती जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ सादर करताना केदार शिंदे प्रोडक्शन सोबत आता आहे मराठी चित्रपट क्षेत्रातील महत्वाचं नाव ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’. पुढच्या वर्षी २८ एप्रिल रोजी पुन्हा गर्जणार महाराष्ट्राच्या थिएटर्समध्ये अजय अतुलचे सुमधुर संगीत! आपल्या लेकीला एक नायिका म्हणून चित्रपटात संधी मिळवून दिल्याने केदार शिंदे खूपच भारावून गेले आहेत. लेकीच्या कौतुकात त्यांनी एक पोस्ट देखील लिहिली होती त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, “तुम्हाला मुलगी झाली आहे.” हे त्या काळाला अनुसरून भित भित जेव्हा नर्स ने मला सांगितलं होतं, तेव्हा आनंदाने नाचलो होतो. तो आनंद त्या दिवसापासून आजपर्यंत टिकून आहे, तो फक्त तुझ्यामुळे.
सना तुझ्या आयुष्यात काहीतरी विलक्षण घडू पाहतंय. हा नवीन प्रवास आहे, ही नवी सुरुवात आहे. मी सतत तुझ्या सोबत असेनच. पण लढा हा तुझा तुलाच लढावा लागणार आहे. भविष्यात लोकांना कायमस्वरूपी लक्षात राहील अशीच कामगिरी तुझ्याकडून होवो. हीच स्वामी चरणी प्रार्थना, ते पाठीशी आहेतच. आपल्याला मराठी संस्कृतीचा अनमोल ठेवा मिळाला आहे. माझे आजोबा आणि तुझे पणजोबा “शाहीर साबळे” यांनी नेहमीच सर्वोत्तम काम करून रसिकांच्या मनात घर केलं. मी तोच प्रयत्न करतो आहे. तू सुद्धा त्याच दिंडीत वारकरी म्हणून सहभागी होते आहेस. तुला खुप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ