सध्या लाल सिंह चढ्ढा या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. १९८६ साली प्रदर्शित झालेल्या फॉरेस्ट गंप या हॉलिवूड पटावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच लाल सिंह चढ्ढा सिनेमावर बहिष्कार घालण्यासाठी सोशल मिडियावर बॉयकॉट अभियान ट्रेंडमध्ये आलं. एकीकडे सिनेमा रिलीज होण्याची तयारी पूर्ण झाली होती तर दुसरीकडे बॉयकॉट मोहीम सुरू होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर ११ ऑगस्टला लाल सिंह चढ्ढा पडदयावर झळकला. आणि प्रेक्षकांनीही या सिनेमाकडे पाठ फिरविल्याचे बॉक्स ऑफीसवरचा गल्ला सांगतोय. याच वातावरणात मराठी शास्त्रीय गायक व अभिनेते राहुल देशपांडे यांची इन्स्टा पोस्ट चर्चेत आली आहे.
यात त्यांनी लाल सिंह चढ्ढा सिनेमाच्या निमित्ताने केलेल्या विधानाचं स्पष्टीकरण दिलं आहे.एका सामान्य मुलाला त्याची आई मोठी स्वप्नं दाखवते. शारीरिक व्यंग असलेल्या मुलाच्या मनातून त्याचा न्यूनगंड बाजूला काढते. त्यानंतर लाल सिंह चढ्ढा त्याच्या आयुष्यात कसा पुढे जातो. अशी कथा असलेल्या लाल सिंह चढ्ढा या सिनेमाचं खास स्क्रिनिंग प्रदर्शनापूर्वी झालं. या खास शोला अनेक मराठी कलाकारांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. यामध्ये शास्त्रीय गायक व अभिनेते राहुल देशपांडे यांनाही बोलवण्यात आलं होतं. लाल सिंह चढ्ढा सिनेमाच्या त्या खास स्क्रिनिंगमध्ये प्रतिक्रिया देताना काही मुद्दे मांडले होते. त्या मुद्द्यांवरूनच राहुल यांनी माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातोय असं वाटत असल्याचं सोशल मिडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राहुल देशपांडे यांनी असं लिहिलं आहे की, रसिकहो लाल सिंह चढ्ढा या सिनेमाच्या प्रिमियरच्या वेळी मी व्यक्त केलेल्या विधानातून पूर्णपणे अनपेक्षित संदेश जातोय असं मला वाटतय. प्रीमियरसाठी एक निमंत्रित कलाकार म्हणून मी त्या सिनेमासाठी परिश्रम घेतलेल्या पडदयावरील व पडद्यामागील सर्वांविषयी सदभावना व्यक्त केल्या. याचा अर्थ सिनेमातील कलाकारांनी यापूर्वी केलेल्या कोणत्याही कृतीचे व त्यांनी मांडलेल्या विचारांचे मी समर्थन करतो असं नाही. आपणा सर्वांइतकीच भारतीयत्वाची भावना माझ्या मनातही प्रबळ आहे व मला त्याचा सार्थ अभिमान आहे. म्हणूनच माझ्या विधानाचा विपर्यास करून घेऊ नये अशी नम्र विनंती. आता राहुल देशपांडे यांनी ही पोस्ट का केली असा प्रश्न चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना पडला आहे.
लाल सिंह चढ्ढा सिनेमाला जो विरोध होत आहे त्यामागे आमिर खान याने यापूर्वी काही देशविरोधात केलेल्या विधानांना कारणीभूत ठरवले जात आहे. भारत देशात राहणं सुरक्षित नाही असंही विधान आमिर खानने केलं होतं ज्यामुळे तो ट्रोल झाला होता. त्याच्या पीके या सिनेमात हिंदूविरोधी संवाद असल्याचे कारण देत प्रेक्षकांनी विरोध केला होता. याचा एकत्रित परिणाम म्हणून आमिरचा सिनेमा बघू नका असे अभियान सुरू होते. सिनेमाच्या प्रिमीयरला हजेरी लावली असताना राहुल देशपांडे यांनी आमिर खानसह इतर कलाकारांचंही कौतुक केलं. पण बॉयकॉट लाल सिंह चढ्ढा या अभियानामुळे राहुल यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ नेटकऱ्यांनी काढला. यासाठीच राहुल यांनी पोस्ट शेअर करत या सिनेमातील कलाकारांची पूर्व विधान किंवा कृतीशी सहमत नसल्याचा निर्वाळा दिला आहे.