टिक टिक वाजते डोक्यात या गाण्याने धुमाकूळ घातलेला, कॉलेज जीवनातील मैत्री, प्रेम यांचा प्रवास दाखवणारा दुनियादारी सिनेमा आठवतोय. दहा वर्षानंतर ते दिवस पुन्हा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांनी दुनियादारी पार्ट २ येणार असल्याचे संकेत दिले आहेत. दुनियादारी हा सिनेमा दहा वर्षापूर्वी पडद्यावर आला. तरूणाईची नस अचूक पकडत लेखक सुहास शिरवळकर यांनी लिहिलेली ही कादंबरी संजय जाधव यांनी सिनेमाच्या रूपात पडदयावर आणली. दमदार कलाकारांनी आपल्या अभिनयाने पुस्तकातील ही पात्र सिनेमाच्या पडदयावर हुबेहूब साकारत अनेक विक्रम मोडले.
स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, ऊर्मिला कोठारे, जितेंद्र जोशी, वर्षा उसगावकर, संदीप कुलकर्णी अशी तगडी गँग या सिनेमात होती. आता पुन्हा दहा वर्षांनी या सिनेमाची चर्चा होत आहे यालाही खास कारण आहे. श्रेयस, मीनू, शिरीन, दिगंबर अर्थात डीएसपी, सुरेखा या पात्रांबरोबरच एस पी कॉलेज, कट्टा या जागाही हिट करणारा दुनियादारी सिनेमा बॉक्स ऑफीसवर तुफान गाजला. कॉलेजमधील मैत्री, प्रेम, दगाबाजी, दुश्मनी, मैत्री आणि प्रेमासाठी काहीही करण्याची धमक हे सगळं पडदयावर पाहताना प्रेक्षकही त्यांच्या कॉलेज जीवनाची सफर करून आले. श्रेयसचा मृत्यू आणि त्याच्या स्मृतीदिनी सगळ्या मित्रांचं कॉलेजच्या कट्ट्यावर भेटणं या नोटवर दुनियादारी सिनेमाचा पहिला भाग संपला होता. त्यानंतर पुढे काय?
या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच दुनियादारीच्या चाहत्यांना मिळणार आहे. दुनियादारीच्या नव्या पर्वात काय होईल याची प्रेक्षकांनी नक्कीच उत्सुकता आहे. पहिल्या भागातीलच कलाकार पुन्हा नव्या दुनियादारीमध्ये भेटणार की नवे चेहरे समोर येणार याचीही उत्सुकता आहे. अजून तरी याबाबत संजय जाधव यांनी सगळया गोष्टी गुलदस्त्यातच ठेवल्या आहेत. खरंतर हा सिनेमा गेल्यावर्षीच येणार होता, मागील काही दिवसात दुनियादारी पार्ट टू चा विचार मागे पडला. आता पुन्हा नव्या दुनियादारीची तयारी सुरू झाल्याचे संकेत संजय जाधव यांच्या पोस्टने दिल्यामुळे प्रेक्षक चांगलेच खुश आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव यांनी त्यांच्या सोशल मिडियावर पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे.
लवकरच दुनियादारी पार्ट २ येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. संजय जाधव यांनी या सिनेमातील काही खास क्षण फोटो स्वरूपात शेअर केले आहेत. सोबत लिहिलेल्या ओळींमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की दहा वर्षापूर्वी तुम्ही या सिनेमाला भरूभरून प्रेम दिलं. तेरी मेरी यारी, चल करू दुनियादारी म्हणत प्रत्यक्षात ते मैत्रीचे क्षण आमच्या सोबत जगले. ते जग, ती मैत्री, ते प्रेम आणि तीच दुनियादारी आता पुन्हा घेऊन आलोत मैत्रीच्या नव्या ढंगात आणि प्रेमाच्या नवीन रंगात. एका नव्या युगाची, नवीन रंगाची न्यु एज ईस्टमन कलर लव्हस्टोरी. तेरी मेरी यारी, आता ‘पुन्हा दुनियादारी’. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.