राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा चर्चा असते ती त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांची. बँक अधिकारी, गायिका असलेल्या अमृता फॅन फॉलोअर्स मध्ये मामी या नावानेही ओळखल्या जातात, त्या सोशल मिडियावरही खूप एक्टीव्ह असतात. नुकतेच अमृता फडणवीस यांनी सुबोध भावेच्या महिला राखीव बसचं तिकिट काढलं. आता या बसमध्ये बसल्यात म्हटल्यावर महिला प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रश्नांना सामोरं जावं लागणारच होतं. अशाच काही प्रश्नांची उत्तरं देताना अमृता बोलून गेल्या, ज्यांना यायचं होतं ते आलेच नाहीत. आता याचा नेमका अर्थ काय याची वेगळी चर्चा रंगली आहे.
अभिनेता सुबोध भावे बस बाई बस शोचं निवेदन करत आहे. या बसमध्ये केवळ महिला सेलिब्रिटींना बोलवलं जातं आणि त्यांना कोणताही प्रश्न विचारण्याची संधी महिला प्रेक्षकांना मिळते. या संकल्पनेवर आधारित हा शो सध्या महिलावर्गात लोकप्रिय झाला आहे. याच शोमध्ये अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. अमृतांच्या गाण्यापासून ते पाककलेपर्यंत त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. अमृता यांनीही दिलखुलास उत्तरं देत महिलांची मनं जिंकली. सोशल मिडियावर त्यांच्याविषयी मामी या नावाने मीम्स चर्चेत असतात. मामी म्हटल्यावर काय वाटतं यावरही अमृतांनी छान वाटतं अस उत्तर दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केल्याची राजकीय उलथापालथ गेल्या महिन्यात चांगलीच गाजली.
शिंदे गट भाजपला मिळाल्यानंतर नवं सरकार स्थापन होणार हे पक्कं झालं. तेव्हा मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार हेही ठरलं होतं. पण आयत्यावेळी मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली तर देवेंद्र यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. ही घटना अजूनही तशी चर्चेत आहे. बस बाई बस या शोमध्ये अमृता फडणवीस यांना एका म्हणीचा अर्थ विचारला आणि ती म्हण होती देर आये दुरूस्त आये. यावर अमृता म्हणाल्या, ज्यांना यायचं होतं ते आलेच नाहीत आणि जे आले ते येणारच होते. अमृता यांनी म्हणीचा अर्थ सांगितला खरा, पण त्यांचा रोख नेमका कुठे होता याचाही उलगडा झाला. अमृताजींच्या उत्तरावर महिला प्रेक्षक खळखळून हसल्या तर सुबोध यांनी वाहवा अशा शब्दात प्रतिक्रिया दिली.