कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील अभिमन्यू आणि लतीकाची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. मालिकेतील अभिमन्यूची भूमिका समीर परांजपेने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने चांगलीच वठवली आहे. अभिमन्यू जितका साधा सरळ दाखवला आहे तितकाच समीर खऱ्या आयुष्यात माजमस्ती करणारा आहे. सेटवर सहकलाकारांसोबत मजामस्ती करताना कायमच पाहिला आहे. आज फादर्स डे चे औचित्य साधून समीरने एक खास पोस्ट लिहिली आहे.
समीरला काही महिन्यांपूर्वीच कन्यारत्न प्राप्ती झाली त्यामुळे आता तो एक जबाबदार बाप म्हणून आपल्या लेकीची काळजी घेत आहे. एका मुलीचा बाप आणि वडिलांच्या नात्यातला त्याने साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यात मी १ टक्का सुद्धा माझ्या वडीलांसारखा नाही हे तो आवर्जून उल्लेख करताना दिसतो. समीर म्हणतो की, ‘बाबांना मला काय म्हणायचंय कळतंच नाही नको ते फाटे फोडतात. पासून हिला काय म्हणायचंय ते मला कळणार नाही असं या जगात काहीही नाही पर्यंतचा प्रवास. सगळ्या गोष्टी बाबांपर्यंत व्हाया आई सांगणारा मी. आता मात्र ही माझाकडे असताना तिने आई आई केलं की मजेने थोडासा जेलस होऊन, का ग ए टोचतो का बाप म्हणत हिला तिच्या आई कडे देणारा मी.
बाबांच्या गाडीवर बसलो की बाबा किती हळू चालवता हो गाडी द्या मी चालवतो म्हणणारा मी. गाडी सावकाश चालवत जा रे असं अख्ख्या जगाने बोंबलून सांगितलं तरी न ऐकणारा मी. ही गाडीत असली की मात्र ६० च्या वर जात नाही. पहिली मारामारी झाली तेव्हां आईला सांगू नको रे. खेळताना पडलो सांग बाकी मी बघतो म्हणणारे तुम्ही आणि हिला पाहिलं व्हॅक्सिन देताना तू जरा बाहेरच थांब मी हिला आत घेऊन जातो असं बायकोला म्हणणारा मी. कॉलेजमधे असताना न सांगता ३१ डिसेंबर ला नेहमीपेक्षा थोडे जास्त पैसे पाठवणारे तुम्ही. वर फालतूपणा करून गटारात पडू नका असा मेसेज पाठवणारे तुम्ही. आणि आता हळूच कोणी आजूबाजूला नाही बघून तुला फ्रीज मधून लपून रोज चॉकलेट देणारा.
आणि हे शेवटचं हा असा उगाच दम देणारा मी आणि रोज बळजबरी ब्रश करून देणारा ही मीच. आई नेहमी म्हणायची बाप होशील तेव्हां कळेल तेव्हा आई बाष्कळ डायलॉग मारू नकोस म्हणणारा मी आणि आता बायको ऐक ना तू होलसेल मध्ये गोष्टी आणणं जरा थांबवशील का असं म्हणते तेव्हा गप गं काहीच वर्ष आपल्या कडे असेल ही त्यात कुठे कंजुषी करू हा फाजील डायलॉग मारणारा ही मीच. हिला पहिल्यांदा तुमच्या हातात देताना, हळूच हा असं म्हटल्या नंतर “बापाला शिकव” हा तुम्ही दिलेला लूक मनात साठवून ठेवलाय. कधीतरी देईन हिला, आगाऊपणा करेल तेव्हां. आत्ताशी दीड वर्षाचा झालोय एवढंच मागेन, बाबा तुमच्यातलं १ टक्के बापपण तरी माझ्यात येवो’.