खेडेगावातून मुंबईत येऊन मराठी सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणे हे खूप कमी जणांना शक्य झालं आहे. असाच मोठा संघर्ष करून कैलाश वाघमारे या कलाकाराने केवळ मराठीच नाही तर बॉलिवूड सृष्टीत देखील आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई हे कैलाश वाघमारे ह्याचं गाव. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कैलाशने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. कॉलेजमध्ये असताना कैलाश वाघमारेने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतून सहभाग दर्शवला. त्याच्या छोट्या मोठ्या भूमिकांचे कौतुक होत होते. अभिनयाचे बारकावे शिकण्यासाठी त्याने मुंबई गाठली.
मुंबई मध्ये आल्यावर नाट्यशास्त्र विषयाची पदवी त्याने प्राप्त केली. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना अनेक पुस्तकं वाचली. त्यामुळे मराठी भाषेवरील पकड मजबूत झाली. अहमदनगर करंडक, पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धांमधून त्याच्या अभिनयाचे कौतुक होत होते. अशातच शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला या नाटकाने आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळवून दिली. या नाटकातील भूमिकेसाठी कैलाशने जीवतोड मेहनत घेतली. वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन त्यांनी हे नाटक सादर केले त्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर कैलाशने मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिका साकारण्यास सुरुवात केली.
मनातल्या उन्हात हा त्याची मुख्य भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट ड्राय डे, भिकारी, हाफ तिकीट सारख्या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर येत राहिला. बहुचर्चित तान्हाजी या बॉलिवूड चित्रपटात कैलाशने चुलत्या पात्राची भूमिका गाजवली. या भूमिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. काल १७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या भिरकीट या चित्रपटातून कैलाश ईलश्याचे पात्र साकारत आहे. अशातच त्याचा हा आनंद द्विगुणित करणारी घटना त्याच्या आयुष्यात घडली आहे. नुकतेच मुंबईमध्ये गाडीच्या एका लॉन्च सोहळ्याला त्याला आमंत्रित करण्यात आले होते. कैलाशच्या हस्ते हा लॉन्च सोहळा पार पडला त्यावेळी त्याने एक खास पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेली पाहायला मिळत आहे.
‘मराठवाड्यातल्या रखरखत्या उन्हात काळीपीवळी टमटमला लटकून प्रसंगी टपावर बसून जावं लागायचं. आपण कधीतरी टप उघडणाऱ्या गाडीचे उद्घाटन करू असे वाटले नव्हते. आज मुंबई मध्ये HYUNDAI VENUE या नव्या SUV गाडीचे लॉन्च आपल्या हस्ते व्हावे यासारखा आनंद तो काय? हि फिलिंग खूपच कमाल आहे! माय म्हणायची, कलेला जीव लाव ती तुला खूप पुढे घेऊन जाईल! आता खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झालाय! शुभेच्छा असूद्या’. आपल्यावर होत असलेल्या प्रेमाच्या कैतुकाच्या वर्षावामुळे कैलाश पुरता भारावून गेला आहे. आयुष्याची हीच खरी सुरुवात, असे म्हणत त्याने आपल्या या प्रवासाला चाहत्यांच्या शुभेच्छा मागितल्या आहेत.