प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर चित्रपटाची चौथ्या आठवड्यात देखील यशस्वी घोडदौड सुरू आहे. प्रेक्षकांची हाऊसफुल्ल दाद मिळवत हा चित्रपट बॉक्सऑफिसवर २६ कोटींहून अधिक कमाई करताना दिसत आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि अभिनित नुकताच रिलीज झालेला सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट देखील बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. जगभर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रेक्षकांची नेहमी टीका असते की मराठी चित्रपट बॉलिवूडच्या तोडीस तोड नसतात. हा चित्रपट अगदी तसाच बनलाय संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट तुडुंब चाललाय. गेल्या ७ दिवसात या चित्रपटाने जवळपास ८ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
या यशाचे श्रेय प्रवीण तरडे आणि चित्रपटातील कलाकारांचे आहे. त्याच्या पाठीवर अशीच एक कौतुकाची थाप दिली आहे ती संगीतकार आणि गायक असलेल्या सलील कुलकर्णी यांनी. प्रवीणचं कौतुक करताना सलील कुलकर्णी म्हणतात की, प्रवीण विठ्ठल तरडे तुझे त्रिवार अभिनंदन. मराठी चित्रपटाचा परीघ मोठा केला आमच्या या मित्राने. एका वेळी सगळ्या थिएटर्सला दोन भव्य चित्रपट एका दिग्दर्शकाचे असणं ही एक अद्भुत घटना आहे. आमच्या मैत्रीचा प्रवास १९९८ ते १९९९ पासूनचा. प्रवीणला कोणतीही गोष्ट करताना पाहिली कि एक गोष्ट जाणवते. हा माणूस त्या त्या वेळेला तिथे तिथे १०० नाही २००% असतो.
लिखाण, दिग्दर्शन, अभिनय, डबिंग, रेकॉर्डिंग, गप्पा, मैत्री सगळीकडे भरभरून जगणारा प्रवीण.ग्रेसच्या कवितेपासून क्रिकेट पर्यंत आणि चित्रपट तर त्याचा श्वास, रंगमंचावर त्याची भक्ती आहे म्हणूनच. कास्टिंग करतांना त्याचा पहिला प्रश्न असतो तुम्ही थिएटर केलंय का? आपल्या मित्रांना बरोबर घेऊन यशाची प्रत्येक पायरी चढणं हा गुण सुद्धा तितकाच मोठा. “धर्मवीर” पाहून त्याच्यामधल्या दिग्दर्शकाला सलाम केला आणि “सरसेनापती हंबीरराव” पाहून एक मित्र म्हणून, एक मराठी कलाकार म्हणून मन अभिमानाने भरून आलं. आता मराठी चित्रपट सुद्धा साऊथ इंडियन फिल्म्स सारखा भव्य दिसतोय.
इतर भाषेतले दिग्दर्शक सुद्धा आता “प्रवीण तरडे” सारखे चित्रपट करा असं म्हणतील ह्याची खात्री वाटते. प्रवीण मित्रा खूप अभिमान आहे तुझ्या या प्रवासाबद्दल. प्रत्येक टप्प्यावर कष्ट घेत इथपर्यंत आला आहेस हे तुझ्या सगळ्या मित्रांना ठाऊक आहे. नवीन लोकांच्या पाठीशी उभा राहतोस तेव्हा तू त्यांच्यात तुझे स्ट्रगलचे दिवस पाहतोस हे सुद्धा जाणवतं. तुझ्यातल्या कलाकाराला वंदन आणि मित्राला एक घट्ट मिठी!