स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मोठा बदल घडून येणार आहे. मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही प्रेग्नंट आहे. तरी देखील गेल्या काही महिन्यांपासून ती या मालिकेत सक्रिय असलेली पाहायला मिळाली होती. मात्र मिनाक्षी आता लवकरच बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे तिने या मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. देवकीची भूमिका मिनाक्षीने तिच्या अभिनयाने सुरेख वठवली. या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. देवकीची भूमिका खरं तर विरोधी भूमिका असूनही तिच्याकडून होणाऱ्या चुकांमुळे तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
मीनाक्षी प्रेग्नंन्ट असल्याची बातमी समजताच ती या मालिकेतून ब्रेक घेणार हे निश्चित होते. मात्र ती मालिकेतून निघून गेल्यास मालिका पाहावीशी वाटणार नाही असे मत प्रेक्षकांनी व्यक्त केले होते. आता मिनाक्षी लवकरच बाळाला जन्म देणार आहे म्हणून येणाऱ्या बाळाच्या आणि स्वतःच्या तब्येतीसाठी तिने मालिकेतून काढता पाय घेतला आहे. मिनाक्षीने ही मालिका काही काळासाठी सोडली असल्याचे सांगितले जाते. मात्र आता सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत देवकीची भूमिका कोण साकारणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. याचे उत्तर आता प्रेक्षकांना मिळाले आहे.
कारण देवकीची भूमिका आता अभिनेत्री भक्ती रत्नपारखी निभावणार असल्याचे समोर आले आहे. भक्तीने झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत मॅडीची भूमिका गाजवली होती. याच मालिकेच्या सिक्वल मध्ये देखील ती हीच भूमिका निभावताना दिसली होती. मॅडीचे पात्र विनोदी स्वभावाचे आणि भोळसट होते. भक्तीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने हे पात्र सुरेख साकारले होते. उंबरठा, देऊळ, ओह माय गॉड अशा हिंदी तसेच मराठी चित्रपटातून तिने काम केले आहे. विनोदी अभिनेते निखिल रत्नपारखी यांच्यासोबत ती विवाहबद्ध झाली. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत भक्तीला देवकीचे पात्र साकारण्याची संधी मिळाली आहे.
मिनाक्षीने तिच्या अभिनयाने वठवलेली देवकीची ही भूमिका भक्तीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. कारण प्रेक्षकांना त्या कलाकाराला त्याच भूमिकेत पाहण्याची सवय झालेली असते. त्यामुळे प्रेक्षक देवकीच्या भूमिकेत भक्तीला स्वीकारणार का हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. मात्र असे असले तरी भक्ती एक उत्तम अभिनेत्री आहे आणि ती ही भूमिका उत्कृष्ट निभावेल अशी आशा आहे. या भूमिकेसाठी भक्ती रत्नपारखी हिला खूप खूप शुभेच्छा.