बहुचर्चित द काश्मीर फाईल्स हा चित्रपट काल शुक्रवारी ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला सुरुवातीपासूनच होत असलेला विरोध पाहून हा चित्रपट यशस्वी ठरणार अशी खात्री वाटत होती. कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला होता. त्यावरून त्याच्या शोवर बंदी आणण्याची मागणी होत होती. तर गेल्या काही महिन्यांपासून तथाकथित समुदायकडून चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळत होत्या. अगदी चित्रपट प्रदर्शनाच्या अगोदर देखील प्रदर्शनावर स्थगिती मिळावी म्हणून प्रयत्न सुरू होते. मात्र ह्या सर्व संकटांवर मात करत अखेर ठरलेल्या वेळीच चित्रपट प्रदर्शित झाला असल्याने प्रेक्षकांनी आणि चित्रपटाच्या टीमने आनंद व्यक्त केलेला पाहायला मिळाला.
१९९० साली घडलेली ही घटना चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवण्याचे काम विवेक अग्निहोत्री यांनी केलेले पाहायला मिळाले. त्यामुळे त्या घटनेचे साक्षीदार असलेल्या किटुंबियांना देखील हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. त्यासाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. चित्रपट पूर्ण झाल्यावर या पीडितांना आपले अश्रू अनावर झाले होते. काल शुक्रवारी पहिल्याच दिवशी चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती. पूर्ण क्षमतेने चित्रपटगृह भरली असल्याने तिकीट बारीवर देखील चांगली कमाई झालेली पाहायला मिळाली. पहिल्याच दिवसात या चित्रपटाने ४.२५ कोटींची कमाई करून आपला जल्लोष व्यक्त केला आहे. जगभरात या चित्रपटाला पहिल्याच दिवशी ६७४ स्क्रीन्स मिळाल्या होत्या.
तर भारतातून या चित्रपटाला ५६१ स्क्रीन्स मिळाल्या. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या निर्मितीसाठी साधारण १२ कोटींचा खर्च आला तर याच्या प्रिंटिंग आणि जाहिरातींसाठी २ कोटींचा खर्च करण्यात आला होता. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणार अशी आशा आहे. शनिवारी आणि रविवारी विकेंड मध्ये प्रेक्षकांचा खूप चंगला प्रतिसाद मिळतो असा अनुभव आहे त्यामुळे आज आणि उद्या या कमाईत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे द काश्मीर फाईल्स या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, पल्लवी जोशी, मृणाल कुलकर्णी या मराठी कलाकारांना महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांचा देखील या चित्रपटाला पुरेसा प्रतिसाद मिळत आहे.