झी मराठी वाहिनीने आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. होम मिनिस्टर , चला हवा येऊ द्या, हे तर काहीच नाय, किचन कल्लाकार या रिऍलिटी शो प्रमाणेच कौटुंबिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक सारख्या मालिकांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. अशातच झी मराठी वाहिनीवर लवकरच आणखी एक मालिका दाखल होणार आहे. येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेच्या जागी येत्या २० मार्च २०२२ पासून ‘तू तेव्हा तशी’ ही नवी मालिका प्रसारित होत आहे. स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहेत.
तू तेव्हा तशी या मालिकेसोबतच आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. बँड बाजा वरात असे या नव्या मालिकेचे नाव असणार आहे. बँड बाजा वरात या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये एका कलशावर झी मराठीकडून सप्रेम असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे हा एक रिऍलिटी शो असावा असा अंदाज बांधला जात आहे. आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम देशभरात गाजला. गेल्या १८ वर्षांपासून आदेश बांदेकर यांनी देशभरातल्या वहिणींचा पैठणी देऊन सन्मान केला आहे. अशाच धाटणीची हा रिऍलिटी शो असावा असे बोलले जात आहे. या शो मुळे झी मराठीवरील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे हे लवकरच उलगडेल.
तूर्तास या मालिकेच्या नावावरूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली पाहायला मिळत आहे. या नव्या दमाच्या मालिकेमुळे त्याच त्याच कथानक असलेल्या आणि द्वेष करणाऱ्या मालिकांना आता बगल दिलेली पाहायला मिळत आहे. सध्या बराचसा प्रेक्षक वर्ग स्टार प्रवाह वाहिनीकडे खेचलेला पाहायला मिळत आहे. मुलगी झाली हो, आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, फुलाला सुगंध मातीचा या स्टार प्रवाहवरील मालिका टीआरपीच्या स्पर्धेमध्ये पुढे आहेत. त्यामुळे नव्या मालिका आणि रिऍलिटी शो आणून प्रेक्षकांची मनं वळवण्याचा प्रयत्न आता झी वाहिनी करताना दिसत आहे. बँड बाजा वरात हा शो प्रेक्षकांची मनं वळवतील का हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.