मुलगी झाली हो या स्टार प्रवाहवरील मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बेदखल केलं आहे. मालिकेतून काढून टाकल्याने त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. स्टार प्रवाह वाहिनी आणि मालिके विरोधात आवाज उठवत असताना आम्ही या चॅनलवर आणि मालिकांवर बहिष्कार टाकतो असेही त्यांच्या चाहत्यांनी म्हटले आहे. व्यावसायिक कारण देत प्रॉडक्शन टीमने किरण माने यांना मालिकेतून काढले असल्याचे म्हटले आहे. शिवाय मालिकेतील कलाकारांना देखील त्यांच्या विरोधात बोलण्याचे सांगितले असल्याचे किरण माने यांचे म्हणणे आहे. मी एक कलाकार आहे आणि मी जर सेटवर वेळेवर पोहोचत होतो, कलाकारांशी चांगलं वागत होतो.
मानधन वाढवून देण्याबाबत देखील माझ्या काहीच तक्रारी नव्हत्या. मी माझं काम अगदी चोख बजावत होतो तरी देखील मला मालिकेतून का काढलं हे कुठेतरी खटकणार आहे. त्यामुळे मी याविरोधात आवाज उठवणार असल्याचे स्पष्टीकरण किरण माने यांनी दिलं होतं. राजकीय पोस्ट मुळे जर तुमच्या हातातून तुमचं काम काढून घेतलं जातं असेल, तर ती खेदाची बाब म्हणावी लागेल असे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान किरण माने यांनी राजकारण्यांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवला आहे. याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील एका गावात स्टार प्रवाहवरील मालिकेचे चित्रीकरण केले जात होते ते चित्रीकरण किरण माने यांच्या समर्थकांनी होऊ दिले नाही.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील गुळुंब या गावात मुलगी झाली हो या मालिकेचे शूटिंग करण्यात येत होते. मात्र गावकऱ्यांनी किरण माने यांना पाठिंबा देत हे चित्रीकरण थांबवले आहे. ही मोहीम सुरू असतानाच मालिकेच्या कलाकारांनी निर्मिती टीमच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केली असल्याचे किरण माने यांचे म्हणणे आहे. ते म्हणतात की, आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्राॅडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू. आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत, अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे. करुद्या आरोप, जाऊद्या झाडून, ते बिचारे पोटार्थी हायेत.
प्राॅडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे. चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते सत्य सांगतीलच. पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा. मी बी कंबर कसलेली हाय, कच्च्या गुरूचा चेला नाय मी!