आज एका मोठ्या पर्वाची सांगता होत आहे, सुमारे १२ वर्षांपूर्वी लिट्ल चॅम्प्स हे पर्व तुफान गाजलं होतं. अगदी त्या पर्वा इतकंच प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रेम मिळालेले यावेळचे पर्व, त्यावेळी महाराष्ट्राला पंचरत्ने मिळाली होती तर यावेळी सप्तसूर मिळाले. प्रत्येक स्पर्धकाची उत्तरोत्तर झालेली प्रगतीचे महाराष्ट्रातील रसिक श्रोते साक्षीदार आहेत.सारेगमप लिटल चॅम्प्सच्या या पर्वात सर्वात जास्त भाग झाले असून हा संगीताचा मंच भल्या भल्यांसाठी स्वप्नपूर्तीचा अलौकिक ठेवा ठरला आहे.
सूत्रसंचालन करताना या सर्वांचा प्रत्यक्ष साक्षीदार होता आले याचे मृन्मयी देशपांडे हिला कौतुक आहे. यानिमित्ताने तिचेही स्वप्न पूर्ण झाले असल्याचा आनंद तिने व्यक्त केला. माहेरपण संपून सासरी पाठवायची वेळ झाली आहे अशी भावना तिने या प्रसंगी वाटत असल्याचे सांगितले. झी मराठी सारेगमप मधील मज्जा मस्ती अनुभव सर्व लिटल चॅम्प साठी मोठं गिफ्ट देऊन गेलेत, सर्व मुलांना भरपुर शिकायला मिळालं. आजवर मुलांनी घेतलेले परिश्रम आणि जिद्द यावर कोणीही विजयी ठरू शकतो. प्रत्येक स्पर्धकाचे गाणे सुरेल आहे त्यामुळे विजेता ठरविण्यासाठी परीक्षकांची दमछाक होणार आहे. एका अर्थी शेवटच्या पायरी पर्यंत पोहोचलेले सर्वजण विजेतेच आहेत, भविष्यात त्यांनी पाय जमिनीवर ठेवून प्रगती करावी अशी अपेक्षा आणि शुभेच्छा तिने दिल्या आहेत. श्रद्धा वैद्य, राशी पगारे, गौरी गोसावी, स्वराज जोशी, सारंग भिलके, दिव्या मगदूम, रागिणी शिंदे, प्रज्योत गुंडाळे, धीरज शेगर, पलाक्षी दीक्षित, ओंकार कानिटकर, रित नारंग, अनन्या देसाई आणि श्रुती भांडे या सर्व स्पर्धकांमधून टॉप ७ स्पर्धक आज सर्वोच्च कलाविष्कार सादर करण्याचा प्रयत्न करतील.
सारेगमप लिटल चॅम्प्स परीक्षकांसाठी सुद्धा हे पर्व खास होते. एक वेळचे पाचही स्पर्धक स्वतः परीक्षकाच्या भूमिकेत येण्यापर्यंतचा त्यांचा आजवरचा प्रवास खूपच सुरेल ठरला आहे. यशाची नवी शिखरे गाठण्याची ही संधी आयुष्याला कलाटणी देणारे ठरणार आहे. आर्या अंबेकर, रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, मृन्मयी देशपांडे, अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्यासोबत आज ५ डिसेंबर संध्याकाळी ठीक ७ वाजता झी मराठी वर महाअंतिम सोहळा बघायला विसरू नका. महाअंतिम सोहळ्यातील सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा.