विश्वचषकाच्या अभूतपूर्व विजयावर आधारित ८३ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू कपिल देव यांच्या जीवनावर आणि भारत जगज्जेता कसा बनला यावर आधारित चरित्र चित्रपट आहे. कपिल देव यांची मुख्य भूमिका अभिनेता रणवीर सिंग निभावत आहे. तुफान फटकेबाजीसाठी कर्नल उपाधी प्राप्त दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेसाठी मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे याची वर्णी लागली आहे. पानी चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूड मधील ही संधी आदिनाथसाठी करिअर चेंजिंग ठरू शकते.
खरं तर या स्पर्धेत भारतीय टीम स्पष्ट अंडरडॉग होती त्यामुळे त्यांच्याकडून फार कमी अपेक्षा होत्या. वेस्ट इंडिज हा त्या काळातील अजिंक्य संघ होता, ज्याने १९७५ आणि १९७९ चे दोन्ही विश्वचषक जिंकले होते आणि १९८३ मध्ये हॅट्ट्रिकचा पाठलाग करणार होता. वेस्ट इंडिज संघात आजवरच्या दिग्गज नावांचा समावेश होता. क्लाइव्ह लॉईड यांच्या नेतृत्वाखाली गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेन्स, मास्टर ब्लास्टर व्हिव्हियन रिचर्ड्स, क्लाइव्ह लॉयड आणि लॅरी गोम्स फलंदाजीसाठी होते. आक्रमक गोलंदाज माल्कम मार्शल, जोएल गार्नर आणि मायकेल होल्डिंग होते, या सर्वांमध्ये ताशी ९० मैलांपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता होती. परंतु लॉर्ड्स लंडन येथे खेळल्या गेलेल्या विश्वचषक फायनलमध्ये १८३ धावसंख्येचा पाठलाग वेस्ट इंडीजसाठी सर्वस्व गमावणारा ठरला. हा एक अविश्वसनीय पराक्रम होता, त्या काळातील अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांना असे होईल यावर विश्वास बसत नव्हता. क्रिकेट विश्वातील भारताचा हा ऐतिहासिक सांघिक विजयाचे प्रतीक म्हणावे लागेल. ज्यात श्रीकांत, संदीप, यशपाल आणि कपिलची खेळी असो, रॉजर बिन्नीचा स्पेल असो किंवा किरीमणीचा झेल असो हे सर्व टीमवर्क होते. ज्यामुळे वर्ल्ड कप मधील विजयाचा प्रत्येक क्षण संस्मरणीय असा ठरला.
प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान यांनी कलाकारांची केलेली निवड खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. रणवीर सोबतच अभिनेत्री दीपिका पदुकोण रोमी देव, ताहिर राज भसीन (सुनील गावसकर), जिवा (कृष्णमाचारी श्रीकांत), साकिब सलीम (मोहिंदर अमरनाथ), जतीन सरना (यशपाल शर्मा), चिराग पाटील (संदीप पाटील), दिनकर शर्मा (कीर्ती आझाद), निशांत दहिया (रॉजर बिन्नी) यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हार्डी संधू (मदन लाल), साहिल खट्टर (सय्यद किरमाणी), अम्मी विर्क (बलविंदर सिंग संधू), धैर्य करवा (रवी शास्त्री), आर बद्री (सुनील वेल्सन), बोमन इराणी (फारुख इंजिनिअर), सतीश आळेकर (शेषराव वानखेडे) तर अभिनेता आदिनाथ कोठारे (दिलीप वेंगसरकर) यांच्या मुख्य भूमिकेतआहेत. चित्रपटासाठी रणवीरने कपिल देव यांच्याकडून विशेष प्रशिक्षण घेतल्याचे सर्वश्रुत आहे. माजी क्रिकेटपटू बलबिंदर संधू आणि यशपाल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली धरमशाला क्रिकेट स्टेडियमवर स्टार कलाकारांनाही प्रशिक्षण देण्यात आले होते.
विश्वचषकातील या विजयाने क्रिकेट जगताचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोनच पूर्णपणे बदलला. भारताला एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक विजेतेपदाची पुनरावृत्ती करण्यासाठी तब्ब्ल २८ वर्षे लोटली. मध्यंतरी प्रदर्शित महिंद्रसिंग धोनीच्या चित्रपटानंतर क्रिकेट विश्वातील या अनोख्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूपच आतुरता आहे. कॅप्टन कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या ऐतिहासिक विजयावर कथानक रंगतदार ठरेल यात शंका नाही.