मराठी सिनेसृष्टीतील अंकुश चौधरी हा तरुणाईचा लाडका चॉकलेट हिरो. मराठी तसेच हिंदी चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तर त्याची पत्नी दिपा परब ही देखील मराठी चित्रपट तसेच हिंदी मालिका जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री. दीपा परब सध्या स्टार प्लस वरील शौर्य और अनोखी की कहाणी या हिंदी मालिकेतून आस्था कश्यपची भूमिका साकारत आहे, तर अंकुश चौधरी स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा या रिऍलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. अंकुशने दिपासोबत २००७ साली लग्न केलं त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे. अंकुश आणि दिपा यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यांनी तब्बल दहा वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले होते.
अंकुश आणि दिपा दोघेही महर्षी दयानंद कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. कॉलेजमध्ये असताना ते एकांकिकामध्ये काम करत असत. त्याचदरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. छानसे करियर सेट झाल्यानंतरच लग्न करायचे असे त्यांनी ठरवले होते. भरत जाधव आणि केदार शिंदे हे अकुंशचे जिगरी मित्र मंडळी. कॉलेजमध्ये असताना हे सर्व मिळून नाटकांच्या स्पर्धा गाजवत होते. केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम केले. या नाटकातील चौघांनी केलेली धम्माल मस्ती रसिक प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत. त्यानंतर दिपा परब अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. याशिवाय हिंदी मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. दीपा हिंदी मालिका सृष्टी गाजवत असताना अंकुश देखील मराठी चित्रपटात आपले स्थान निर्माण करू लागला होता.
अगदी जीस देश में गंगा रेहता है सारख्या हिंदी चित्रपटात देखील त्याने सहाय्यक भूमिका बजावल्या होत्या. त्यादरम्यान अंकुशने मराठीत दगडी चाळ, क्लासमेट्स, गुरु, दुनियादारी, डबल सीट, देवा, धुरळा, ती सध्या काय करते, झकास, उलाढाल, लालबाग परळ, चेकमेट यासारखे एकाहून एक हिट चित्रपट देत तो सुपरस्टार बनला. याच दरम्यान दोघांनी गुपचूप साखरपुडा केला होता. याची खबर त्यांनी मीडियाला सुद्धा दिली नव्हती. अभिनयक्षेत्रात नाव कमावल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दिपा लग्नानंतर खूपच कमी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी आलेल्या अंड्याचा फंडा या चित्रपटात ती झळकली होती.