माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा आणि परीच्या घराशेजारी बंडू काका आणि काकी राहतात. आमच्या मागच्या सदरात काकींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मानसी मागिकर यांचा अल्पसा परिचय करून देण्यात आला. त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. आजच्या सदरात बंडू काकांबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
मालिकेत बंडू काकांची भूमिका साकारली आहे अभिनेते “अजित केळकर” यांनी. अजित केळकर हे अभिनेते तसेच निर्माते म्हणूनही ओळखले जातात. अजित केळकर यांचे आई आणि वडील दोघेही शिक्षक त्यामुळे त्यांचा कलाक्षेत्रात येण्याला घरातून अजिबात विरोध नव्हता. वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी त्यांनी आकाशवाणीवर ऑडिशन दिली होती. ६० ते ७० च्या दशकात त्याकाळी कलाकारांची निवड याच माध्यमातून केली जात होती. ऑडिशनमध्ये पास झाल्यावर त्यांना बालनाट्यात बालकलाकाराच्या भूमिका मिळाल्या. वयाच्या १२ व्या वर्षी नाट्यस्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. वडील उत्तम शिक्षक आणि मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषा चांगल्या अवगत असल्याने त्यांचे हे गुण अजित केळकर यांनी देखील अंगिकारले. मग शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धांमध्ये ते नेहमी सहभाग घ्यायचे. दोघेही भाऊ इंजिनिअर आणि आर्क्टिटेक्ट असल्याने आपणही डॉक्टर व्हावे ही अपेक्षा त्यांनी केली होती. मात्र नाटकाच्या ओढीने त्यांनी अमृत नाट्यभारती संस्थेत प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली त्यामुळे त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न मागे पडले. मधल्या काळात मात्र नाटकातून मिळणारे तुटपुंजे मानधन पाहून त्यांनी नोकरी करण्याचे ठरवले. नाटकातील विनोदी भूमिकांसाठी आणि सहाय्यक भूमिकांसाठी त्यांना एका प्रयोगाचे केवळ १५ ते २० रुपये मानधन मिळायचे त्यामुळे यावर आपले पोट भरणार नाही हे मनाशी पक्के करून कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी त्यांनी स्वीकारली. सख्खे शेजारी, पुन्हा शेजारी पती गेले ग काठियावाडी या नाटकांची निर्मिती त्यांनी केली.
‘आर के लक्ष्मण कॉमन मॅन’ या इंग्रजी भाषिक नाटकातून त्यांनी भूमिका रंगवल्या. या नाटकाचे अमेरिका, कॅनडात देखील प्रयोग सादर करण्यात आले. Educating Rita या नाटकाची निर्मिती आणि अभिनय देखील त्यांनी साकारला होता. जावई माझा भला, मेरे दिल से, सिटी ऑफ ड्रीम्स अशा चित्रपट आणि नाटकातून ते नेहमीच प्रेक्षकांसमोर येत राहिले. गिट्स, जे के व्हाइट सिमेंट, विमा बार, रसना, उजाला सुप्रीम यासारख्या तब्बल ३० हुन अधिक व्यावसायिक जाहिरातीतून त्यांना झळकण्याची संधी त्यांना मिळत गेली. मधल्या काळात अपेक्षित यश न मिळाल्याने कालाक्षेत्रापासून ते दूर राहिले , आपल्या वयाचे अनेक कलाकार खूप पुढे गेले आपणही हे करू शकलो असतो याची खंत त्यांना कायम आहे. नाट्य क्षेत्राचा एवढा दांडगा अनुभव असलेला हा कलाकार आज झी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. मालिकेतील बंडू काकांच्या भूमिकेसाठी अजित केळकर यांना मनःपूर्वक शुभेच्छा….