प्रसिद्ध नाट्य-सिनेअभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून सर्वश्रुत होत्या. त्यांनी नंदनवन या नाटकात बालवयात काम केले होते. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बी. कॉम पदवी संपादन करीत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतून त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी नृत्य हा वि़षय घेऊन एम.ए. केले होते. मराठी सिनेसृष्टीतील कमालीच्या भूमिका साकारल्या. तप्तपदी, महागुरू, बावरे प्रेम हे, आरंभ, क्षण हा मोहाचा या व अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर रुजल्या. त्यांनी टेलिव्हिजन जगतातील मालिकात अभिनयाची छाप उमटवली होती, यात प्रामुख्याने दूर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात अशा मालिका आहेत. कलर्स वाहिनीवरील गणपती बाप्पा मोरया मध्ये रावणाच्या आईची भूमिका साकारली होती जी खूपच गाजली. चित्रपट, नाटक, मालिका या तीनही माध्यमात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. “देबू”, “महागुरू”, “बावरा प्रेम हे”, “तप्तपदी”, “आरंभ”, “हायकमांड”, “एक पल प्यार का”, “क्षण हा मोहाचा”, “मराठा टायगर्स”, ” काॅफी आणि बरंच काही”, ” डंक्यावर डंका ” अशा चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. “दुहेरी”, “तू भेटशी नव्याने”, “अहिल्याबाई होळकर”, “ऐतिहासिक गणपती”, “त्या तिघींची गोष्ट”, “एका क्षणात”, “संगीत बावणखणी” या नाटकातील त्यांची भूमिका अजरामर आहे. अभिनयाबरोबरच शास्त्रीय नृत्यावरही त्यांचे तितकेच प्रेम होते. ‘संगीत बावनखणी’ नाटकाच्या भैरवीवर नृत्य करण्यासाठी रंगमंचावर आल्या. प्रसिद्ध गायिका रेवा नातू आणि चिन्मय जोगळेकर यांनी नाट्यगीत सादर केले. नृत्य करीत असताना तिहाई घेतल्यावर रंगमंचावर कोसळल्या. त्यांना तातडीने पेरुगेटजवळील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री त्यांचे निधन झाले, त्या केवळ ४४ वर्षांच्या होत्या.
चित्रपट, रंगभूमी आणि टीव्ही मालिका या तीनही माध्यमांमध्ये लीलया वावरणारा अभिनेता म्हणून आनंद मोरेश्वर अभ्यंकर यांचा नावलौकिक होता. ते नागपूरच्या सरस्वती हायस्कूलमध्ये शिकले, उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात दाखल झाले; इथे त्यांच्या अभिनय कौशल्याला खरा वाव मिळाला. गरवारे महाविद्यालयामधून ते बी कॉम शाखेतील पदवीधर झाले. आपल्या प्रतिभाशाली अभिनयाने लाखो रसिकांची मने जिंकून घेतली.. ‘आई रिटायर होतेय’, आनंद म्हसवेकर लिखित-दिग्दर्शित ‘चॉइस इज युवर्स’ अशा नाटकांमध्ये त्यांनी भूमिका गाजवल्या. ‘असंभव’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘वादळवाट’, ‘फू बाई फू’, ‘मला सासू हवी’, ‘शुभंकरोती’, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि सह्याद्री वाहिनीवरील गोंदवलेकर महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून चाहत्या प्रेक्षकांचा विशेष वर्ग स्थापन केला. ‘वास्तव’, ‘जिस देश में गंगा रहता हैं’, ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘अकलेचे कांदे’, ‘तेरा मेरा साथ रहें, ‘मातीच्या चुली’, ‘चेकमेट’ अशा विविध चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका गाजवल्या. आनंद अभ्यंकर यांचे २३ डिसेंबर २०१२ रोजी अपघाती निधन झाले होते.
मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील विनोदी भूमिकांन मुळे अभिनेत्री रसिक जोशी फेमस होत्या. मराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज हिंदी दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही त्यांना अभिनयच्या संधी मिळाल्या. प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश जोशी यांच्या त्या पत्नी होत. नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. अभिनेत्री रसिका जोशी यांच्या निधनाने हिंदी चित्रसृष्टीही हळहळली होती. सुमारे दशकभर रसिका यांनी रक्ताच्या कर्करोगाशी कडवट झुंज दिली. असे असतानाही त्यांनी त्यांच्या अभिनयावर कुठलाही परिणाम होऊ दिला नाही. तुषार कपूरसोबत एका चित्रपटात रसिका जोशींनी त्याची आईची भूमिका साकारली होती. रामगोपाल वर्मा यांच्या त्या फेवरेट होत्या. ‘डरना जरुरी है’, ‘वास्तूशास्त्र’, ‘गायब’, ‘इटस् नॉट अ लव्ह स्टोरी’, ‘भूत अंकल’, ‘भुलभुलय्या’, ‘मालामाल वीकली’, ‘जॉनी गद्दार’, ‘बिल्लू बार्बर’, ‘खलबली’ या सिनेमांतून त्यांना अभिनयाची संधी मिळाली होती. रसिका यांच्या मृत्यू नंतर राम गोपाल वर्मा यांची प्रतिक्रिया विशेष होती, ‘‘रसिका एक असामान्य दर्जाची अभिनेत्री होती. त्यांच्या क्षमतेचा वापर करण्यात हिंदी चित्रपटसृष्टीच कमी पडली.’’ वयाच्या ३९व्या वर्षी वांद्रे, मुंबई येथे रुग्णालयात रक्ताच्या कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला.
मराठी गायिका, नाट्यअभिनेत्री व चित्रपट अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांचा जन्म मुंबई येथील, त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण गिरगावातील सेंट कोलंबो हायस्कूल मधून पूर्ण झाले. आशालता वाबगांवकर ह्या मानसशास्त्रात एम.ए. होत्या हि वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. मराठी चित्रपट आणि नाट्य विश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या आणि एक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर रसिक प्रेक्षक विसरू शकत नाहीत. आश्चर्य नंबर १०, वन रूम किचन, लेक लाडकी, पकडापकडी, गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, चिना, मोहनंदा यासारख्या अनेक नाटकात त्यांनी काम केले. तसेच उंबरठा, सुत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होते. आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्या सर्व परिचित झाल्या त्यांच्या अनेक भूमिका विशेषत्वाने लोकांना आवडल्या एक हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांची कारकीर्द महत्त्वपूर्ण राहिली. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांचे निधन झाले.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यानं नैराश्येमुळे आत्महत्या केल्यानंतर मराठी अभिनेता आशुतोष भाकरेच्या आत्महत्येनं मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. अभिनेत्री मयुरी देशमुखशी २१ जानेवारी २०१६ रोजी आशुतोषसोबत लग्न केले होते. गेल्या वर्षी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सहभागी होणाऱ्या कलाकारांबाबत सोशल मीडियावर मयुरीचं नाव चर्चेत होते. आशुतोषने भाकर या कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या हलाखीच्या जीवनशैलीवर आधारीत चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारली होती. इचार ठरला पक्का या मराठी चित्रपटात देखील त्याने महत्वाची भूमिका साकारली होती. खुलता कळी खुलेना मालिकेतून मयुरी घरोघरी पोहोचली होती, त्यानंतर तिने प्रायोजित नाटकामध्येही काम केले. काही महिन्यापूर्वी आशुतोषने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून लोक आत्महत्या का करतात.. असा व्हिडिओ शेयर केला. त्यानंतर आशुतोष असा टोकाचा निर्णय घेईल असे कोणालाही वाटले नव्हते.
अभिलाषा पाटीलने बायको देता का बायको, ते आठ दिवस, प्रवास, तुझं माझं अरेंज मॅरेज, पिप्सी अशा मराठी सिनेमांमध्ये काम केले. चित्रपटांसोबत मराठी मालिका बापमाणूस मध्येही महत्वाची भूमिका साकारली होती. बॉलिवूड मध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिलाषाने गुड न्यूज, छिछोरे मधील राघवची परिचारिकेची भूमिका आणि बद्रीनाथ की दुल्हनिया अशा हिंदी सिनेमा आणि काही वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळविली होती. मराठी आणि हिंदी मालिकांसोबत सिनेमांमधून झळकलेल्या अभिलाषाचे वयाच्या ४० व्या वर्षी २०२१ मे महिन्यात आकस्मित निधन झाल्याच्या बातमीने रसिकांना मोठा धक्का बसला. सोशल मीडियावरून अनेक मराठी आणि हिंदी दिग्ग्ज कलाकांनी शोक संदेश व्यक्त केले.
लेखक, दिग्दर्शक, अभिनेते दिग्पाल लांजेकर यांचे मराठी ब्लॉकबस्टर ऐतिहासिक चित्रपट फत्तेशिकस्त आणि फर्जंद मध्ये विशेष भूमिका साकारलेले अभिनेते नवनाथ गायकवाड यांचा देखील मागील मे महिन्यात आकस्मित मृत्यू झाला. फत्तेशिकस्त या चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल देव, समीर धर्माधिकारी यांच्यासह अंकित मोहन आणि मृण्मयी देशपांडे यांच्या भूमिका महत्त्वपूर्ण होत्या. फर्जंद आणि फत्तेशिकस्त मध्ये महत्वाची भूमिका साकारणाऱ्या नवनाथ गायकवाड या एका अत्यंत गुणी आणि मेहनती कलाकाराचे दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना’, अशा प्रतिक्रियेद्वारे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी श्रद्धांजली वाहिली. नवनाथच्या जाण्याने मराठी सिनेसष्टीतील एक गुणी कलाकार वयाच्या ४० व्या वर्षी गेल्याने रसिक प्रेक्षकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
कमी वयात मराठी सिनेसृष्टी गाजवणारा हा धडाकेबाज अवलिया कलाकार विसरून चालणार नाही. लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत सुमारे दोन दशके अक्षरश: धुमधडाका घातला. विनोदाचे परफेक्ट टायमिंग असणाऱ्या अभिनेत्या लक्ष्याला खरा ब्रेक मिळाला टुरटुर व्यावसायिक या नाटकामुळे. कारकिर्दीत पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरलेला असा एखाद दुसराच कलाकार असेल. अशोक मामा, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत यांच्या जोडीने मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजविले, वास्तविक या तिन्ही कलाकारांचे विनोदाचे टायमिंग अतिशय अचूक होते..
प्रसिध्दीच्या ऐन झोतात असताना त्याला सुपरहिट चित्रपट मैने प्यार किया या मध्ये काम करण्याची संधी मिळाली. यात लक्ष्मीकांतने सलमानच्या मित्राचे पात्र अगदी लीलया निभावले. याशिवाय साजन, हम आपके हैं कौन, आरझू, बेटा, अनारी अशा विविध हिंदी चित्रपटात संधी मिळत गेल्या परंतु मराठी सारखा अभिनयाचा उच्चांक गाठायला साजेशा भूमिका वाट्याला आल्याच नाहीत. एक होता विदुषक या नाटकातील गंभीर भूमिकेने लक्ष्मीकांतच्या अभिनयक्षमतेवर रसिकांनी नाटक अक्षरशः डोक्यावर नाचविले. याशिवाय शांतेचे कार्टे चालु आहे, बिघडले स्वर्गाचे द्वार, लेले विरूध्द लेले यासारखे विनोदी रंगमंच नाटकेही त्याने यशस्वी करून दाखविले. मराठीतील गाजविलेल्या प्रमुख चित्रपटांमध्ये दे दणादण, अशी ही बनवाबनवी, थरथराट, धडाकेबाज, हमाल दे धमाल, रंगत संगत, पटली रे पटली असे सुपर डुपर चित्रपट होते. वयाच्या पन्नाशीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले. मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या अमूल्य योगदानामुळे आजही लक्ष्या रसिकांच्या स्मरणात आहेत आणि कायम राहील.