ज्येष्ठ अभिनेते “प्रदीप वेलणकर” यांचे अनेक वर्षानंतर मालिकेत आगमन झाले आहे. कलर्स मराठीवरील “बायको अशी हव्वी” या मालिकेतून प्रदीप वेलणकर एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. शिर्के कुटुंबाचे ज्येष्ठ सदस्य आणि विभासचे वडील या मालिकेतून ते साकारताना दिसत आहेत. महिलांनी पुरुषांची मक्तेदारी सांभाळावी, त्यांनी चौकटीबाहेर जाऊ नये अशी विचारसरणी असलेल्या विरोधी भूमिकेत ते पाहायला मिळत आहेत. या मालिकेअगोदर त्यांनी बॉलिवूड चित्रपटात तसेच अनेक मराठी चित्रपटातून पोलिसच्या भूमिका साकारल्या आहेत. एक गाडी बाकी अनाडी, ठाकरे, पेज 3, आभास, चकवा, बकेट लिस्ट, असंभव, या गोजिरवाण्या घरात अशा अनेक चित्रपट आणि मालिकेतून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
प्रदीप वेलणकर यांच्या पत्नीचे नाव रजनी वेलणकर पार्ले टिळक विद्यालयात त्या शिक्षिका होत्या. गौरी, मीरा, मधुरा ही तीन अपत्ये त्यांना आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा “वेलणकर साटम” ही प्रदीप वेलणकर यांची मुलगी आहे. आपल्या वडीलांप्रमाणे मधुराने देखील हिंदी मराठी सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ज जंतरम म मंतरम या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका तिने साकारली होती तर हापूस, सरी वर सरी, एक डाव धोबी पछाड अशा चित्रपटात तिने अभिनय साकारला आहे. याशिवाय अधांतरी आणि नॉट ओन्ली मिसेस राऊत मधील भूमिकेसाठी तिला विशेष अभिनेत्री पुरस्कार देण्यात आला आहे. मधुरा एक उत्तम लेखिका देखील आहे. ‘मधुरव’ अंतर्गत तीने मराठी भाषिक अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक अभिजित साटम यांच्यासोबत मधुरा विवाहबद्ध झाली आहे. अभिजित हा ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांचा मुलगा असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे परंतु इंजिनिअर असूनही त्याने हत्यार, तेरा मेरा साथ रहे या हिंदी चित्रपटातून अभिनय साकारला होता.
मधुरा आणि अभिजित यांना युवान नावाचा मुलगा आहे. ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम हे मधुराचे सासरे आहेत. शिवाजी साटम यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून सीआयडी मालिकेतून एसीपी प्रद्युमनची भूमिका गाजवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. वास्तव, उत्तरायण, दे धक्का, हापूस, नायक, विरुध, वजुद अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रदीप वेलणकर आणि शिवाजी साटम या दोन्ही कलाकार कुटूंबाला खूप खूप शुभेच्छा आणि यापुढेही या कुटुंबाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहावे हीच सदिच्छा….तुर्तास प्रदीप वेलणकर यांना बायको अशी हव्वी मालिकेसाठी शुभेच्छा आणि अभिनंदन!